उंच डोंगरावर ,दिवसभर मचाणावर कित्येक महिन्यांपासून अभ्यासाठी धडपडतायेत राजापूरातील विद्यार्थी

राजेंद्र बाईत
Wednesday, 28 October 2020

राजापूर तालुक्‍यातील साखरकोंबे येथील स्थिती; गावापासून दूरपर्यंत रोज पायपीट, पालकांची साथ

 राजापूर : दीर्घकाळ गायब असलेल्या मोबाईल रेंजसह इंटरनेट सेवेअभावी २१ व्या शतकातील डिजिटल युगामध्ये अनेक गावांमधील विद्यार्थ्यांचा ॲन्ड्रॉईड मोबाईल आणि टीव्ही सुविधा उपलब्ध असतानाही ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा खेळखंडोबा झाला आहे. त्यावर मात करीत तालुक्‍यातील साखरकोंबे येथील विद्यार्थी उंच डोंगरावर पालकांनी बांधून दिलेल्या आणि इंटरनेटची पुरेशी रेंज असलेल्या निसर्गाच्या सान्निध्यातील माचाणावर गेल्या कित्येक महिन्यांपासून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. 

लोकवस्तीपासून दूर असलेल्या, डोंगरावरील सुमारे एक कि.मी. अंतरावर असलेल्या मचाणच्या येथे जाण्यासाठी या विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. दुपारच्या जेवणाची वेळ सोडली तर ऑनलाईन लेक्‍चरसाठी सकाळी ६ वाजता मुले घर सोडतात. सायंकाळचे लेक्‍चर ॲटेंड करून रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घरी परततात. या साऱ्यामध्ये ते अभ्यास करण्याच्या ध्यासापासून तसूभरही मागे हटलेले नाहीत. पंधराहून अधिक विद्यार्थी त्या माचाणावर शिक्षणाचे धडे गिरवतात. पान २ वर 
दिवसभर विद्यार्थी अभ्यासासाठी डोंगरात माचाणावर

साखर येथील सुमारे तीनशे-साडतीनशे लोकवस्तीचे कोंबे हे ठिकाण काहीशा खोलगट भागामध्ये वसलेले आहे. या परिसरामध्ये बीएसएनएल वा जिओ वा अन्य कंपन्यांच्या रेंजसह इंरनेटची रेंज येते; मात्र कोंबेच्या लोकवस्तीमध्ये इंटरनेट नाही. कोणत्याही मोबाईलची रेंज नाही. अशा स्थितीत आपली मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे म्हणून येथील पालकांनी डोंगरावर माचाण बांधले. त्या ठिकाणी बसून गेल्या काही महिन्यांपासून येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची धडपड आणि त्यांना पालकांची मिळत असलेली साथ कौतुकास्पद म्हणावी लागेल. 

हेही वाचा- जीआय मानांकनात कोल्हापुरी गुळाचा समावेश ;  राज्य कृषी पणन विभागातर्फे चार योजना -

मुंबई येथे सध्या एफवायबीएमध्ये शिकत आहे. लॉकडाउनमध्ये गावी आले. कॉलेजची ऑनलाईन लेक्‍चर सुरू झाली आहेत; मात्र गावामध्ये मोबाईल रेंज वा इंटरनेट नसल्याने लेक्‍चर ॲटेंड करता येत नाही. त्यामुळे वडिलांसह ग्रामस्थांनी घरापासून दूरवर असलेल्या सड्यावर ऑनलाईन शिक्षणासाठी आम्ही जातो. भविष्यामध्ये मोबाईल रेंज वा इंटरनेट सुविधेसाठी प्रयत्न व्हावेत.
- काजल एकनाथ मिरगुले, विद्यार्थिनी.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online education student problem in rajapur