यंदा हापूसचे `इतकेच` उत्पादन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

रत्नागिरीत बहुतांश ठिकाणी अजूनही मोहोरच दिसत आहे. ढगाळ वातावरण आणि उशिरा पडत असलेली थंडी यामुळे पुनर्मोहोराचे संकट निर्माण झाले आहे.

रत्नागिरी - बदलेल्या वातावरणाचा परिणाम यंदाच्या आंबा हंगामावर होणार असून 15 टक्‍केच पीक हाती लागणार आहे. तेही एप्रिल, मे मध्ये मिळणार असल्यामुळे दरात घसरण होईल. त्याचा आंबा बागायतदारांना फटका बसणार आहे. यंदा मार्चमध्ये काहीच पीक हाती येणार नसल्याने बागायतदारांच्या उत्पन्नात घट होईल, अशी चिंता आंबा उत्पादकांनी व्यक्‍त केली आहे. 

आंबा बागायतदार तुकाराम घवाळी, बावा साळवी, प्रसन्न पेठे, राजेंद्र कदम यांनी यंदाच्या उत्पादनातील घटीवर चिंता व्यक्‍त केली. यावर्षी आंबा पिकावर निसर्गाची अवकृपाच राहिली आहे. निसर्गाच्या चक्रात अडकलेला आंबा यंदा उशिरा येणार आहे. नोव्हेंबरमध्ये येणारा मोहोर जानेवारीत येऊ लागला.

हेही वाचा - कोकण कृषी विद्यापीठातील पाच मेसवर कारवाई 

रत्नागिरीत बहुतांश ठिकाणी अजूनही मोहोरच दिसत आहे. ढगाळ वातावरण आणि उशिरा पडत असलेली थंडी यामुळे पुनर्मोहोराचे संकट निर्माण झाले आहे. किडरोगांपासून मोहोर वाचवण्यासाठी 10 ते 15 वेळा फवारणी करावी लागत आहे. फवारणीचाच खर्च 7 ते 8 लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. ते भरुन काढण्याचे आव्हान बागायतदारांपुढे यंदा आहे. त्यातून वाचलेला आंबा एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्यातच येईल. तोही 15 टक्‍केच असेल. त्याला दर मिळणेही शक्‍य नाही. उशिरा आलेला आंबा कॅनिंगलाच घालावा लागणार आहे. खर्च भरून निघावा यासाठी 40 ते 50 रुपये किलोला दर मिळणे आवश्‍यक आहे. ही मागणी शासनाकडे करणार असल्याचे बागायतदारांनी सांगितले. 

हेही वाचा - लयभारी ! दुबईला जाणार रत्नागिरीची कलिंगडे 

शेती अवजारे, कीटकनाशके, खते यांच्यावरील जीएसटी माफ करावा. विमा हप्ता परवडत नसल्याने अनेकांनी पिकाचा विमा काढलेला नाही. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. त्यानुसार विम्याचे निकष असणे आवश्‍यक आहे. राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपनीला रक्‍कम न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. यामुळे शेतकरी कर्जमुक्‍त होईल. 

बागायतदारांचे कंबरडे मोडले 

खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने आंबा बागायतदारांनी जागा, बागा आणि दागिने विकून कर्जाचे हप्ते भरले आहेत. त्यामुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रश्‍न तातडीने सोडवून न्याय द्यावा, अशी मागणी या बागायतदारांनी केली. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only 15 Percent Production Of Hapus In Ratnagiri Marathi News