
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या धामणी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रीमंत बळीराजा शेतकरी संघाची स्थापना केली. या गटामार्फत 6 एकरवर कलिंगडासह कांदा, ऊस, कोबी, ढोबळी मिरची, वांगी, मिरची, टोमॅटो, दोडकी, भेंडी, मुळा, मटार, कोथिंबीर, हळदीची लागवड करण्यात आली.
लयभारी ! दुबईला जाणार रत्नागिरीची कलिंगडे
संगमेश्वर ( रत्नागिरी ) - तालुक्यात उत्पादित झालेली कलिंगडे आता दुबईवासीयांना चाखायला मिळणार आहे. तालुक्यातील धामणी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या सेंद्रिय शेतीतील कलिंगडांची यंदा प्रथमच निर्यात होणार आहे. हे विशेष.
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गापासून हाकेच्या अंतरावर वसलेल्या धामणी गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत श्रीमंत बळीराजा शेतकरी संघाची स्थापना केली. या गटामार्फत 6 एकरवर कलिंगडासह कांदा, ऊस, कोबी, ढोबळी मिरची, वांगी, मिरची, टोमॅटो, दोडकी, भेंडी, मुळा, मटार, कोथिंबीर, हळदीची लागवड करण्यात आली. या गटाला एबीपी एक्झॉटिक पाटणतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता या गटाने ही शेती यंदा चांगलीच यशस्वी करून दाखवली आहे.
हेही वाचा - कोकण कृषी विद्यापीठातील पाच मेसवर कारवाई
गिरीश जातीच्या कलिंगडाची निर्यात
या शेतकऱ्यांनी गिरीश, विशाला, सरस्वती, अनमोल अशा विविध जातीच्या कलिंगडांची लागवड केली. यातील गिरीश या जातीच्या कलिंगडाची निर्यात दुबईला करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर ग्राहकांना हा भाजीपाला उपलब्ध होण्यासाठी या गटाने धामणी येथे राष्ट्रीय महामार्गाजवळ एक शेड उभारली असून या ठिकाणी या मळ्यातील सर्व सेंद्रिय ताजी भाजी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते. विशेष म्हणजे याला स्थानिक ग्राहकांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गटाने गेल्या वर्षीही सामूहिक शेती केली होती. त्या वेळी त्यांना चांगला नफा झाल्याने या वर्षी त्यांनी वाढीव जागेत हा प्रयोग केला आणि तो यशस्वी करून दाखवला आहे.
20 मार्चनंतर कलिंगडाची काढणी
जिल्ह्यातून प्रथमच हापूसनंतर कोकणी कलिंगडाची निर्यात केली जाणार आहे. 20 मार्चनंतर कलिंगडाची काढणी करून ती निर्यातीला देण्यात येणार आहेत. या कलिंगडावर फळमाशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी रक्षक सापळे लावण्यात आले आहेत त्यामुळे निर्यातीला कोणतीही अडचण येणार नाही.
चार किलोच्या वरचे कलिंगड निर्यात...
संगमेश्वरातील कलिंगड दुबईला निघाल्याने पुढील वर्षी ती अन्य देशात पाठवण्याचा मार्गही मोकळा होणार आहे. चार किलोच्या वरचे कलिंगड निर्यात होणार असून उर्वरित फळे स्थानिक पातळीवर विकली जाणार आहेत.
रासायनिक खतांचा अतिवापर करून आपणच आपले नुकसान करून घेण्यापेक्षा सेंद्रिय शेतीवर उत्तम रितीने भाजीपाला पिकू शकतो, हे आम्ही दाखवून दिले आहे. आता आमची कलिंगडे दुबईत निघाल्याने आमचा हुरूप आणखी वाढला आहे.
- चंद्रकांत बांबाडे, शेतकरी