मंदिरांसाठी मनसेचा सावंतवाडीत घंटानाद 

भूषण आरोसकर
Wednesday, 28 October 2020

विविध राज्यांमधील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी खुली करण्यात आली; मात्र राज्यात अद्यापही मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - राज्य सरकार मॉल, दारूची दुकाने उघडू शकते; मात्र मंदिरे का उघडली जात नाहीत? याचा निषेध म्हणून तसेच लवकरात लवकर बंद असलेले मंदिरे सुरू करण्यात यावे, यासाठी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर मनसेतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारने मंदिरात सुरू करावीत, असे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिले. 

मंदिरे भाविकांसाठी लवकरात लवकर सुरू न उघडल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. "मिशन बिगेन' अंतर्गतमध्ये असलेल्या अटी शिथिल करत देशातील विविध राज्यांमधील प्रमुख देवस्थान भाविकांसाठी खुली करण्यात आली; मात्र राज्यात अद्यापही मंदिरे तसेच धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्याचा निषेध म्हणून मनसेतर्फे प्रांत अधिकाऱ्याला प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे घंटानाद आंदोलन केले होते. यावेळी प्रांताधिकारी कार्यालयासमोर महापुरुषाच्या मंदिरासमोर मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घंटानाद करीत जोरदार घोषणाबाजी केली. आघाडी सरकारचा निषेध असो, सुरु करा, सुरु करा, मंदिरे भाविकांसाठी सुरू करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

राज्यासह सिंधुदुर्गातील येथील तालुक्‍यातील मंदिरे उघडण्याची सुबुद्धी या आघाडी सरकारला मिळावी आणि गेल्या कित्येक दिवसापासून झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, या मागणीसाठी हे आंदोलन केल्याची प्रतिक्रिया उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर हे निवेदन प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांना दिले. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, येथील तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुका सचिव विठ्ठल गावडे, मनसेचे कामगार सेना कार्याध्यक्ष संतोष भैरव, कर कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, उपशहराध्यक्ष शुभम सावंत, माजी जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, आकाश परब, भास्कर सावंत, तालुकाध्यक्ष सुधीर राऊळ, वेत्ये शाखाध्यक्ष महादेव पेडणेकर, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संकेत मयेकर आदी उपस्थित होते. 

मंदिरे का उघडू नये? 
राज्य सरकार मॉल दारूची दुकाने उघडू शकते, बससेवा सुरू करू शकते, जिम, ग्रंथालय सुरू करण्यात येतात तर मंदिरे का सुरू होत नाहीत? भाविकांसाठी मंदिरे उघडली जावीत, अशी मागणी करण्यात आली. मंदिराच्या आजुबाजूला असलेल्या लोकांचा, पूजा-अर्चा करणाऱ्या भाविकांचा व दर्शनासाठी येणाऱ्या भक्तगणांचा राज्य सरकारने विचार केला आहे का? असा सवाल आंदलनकर्त्यांनी उपस्थित केला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To open temples MNS agitation in Sawantwadi