आंबोली-चंदगड संवर्धन राखीव क्षेत्राला विरोध़; कुणी धाडले वनविभागाला माघारी

प्रभाकर धुरी
Monday, 24 August 2020

तिलारीपाठोपाठ शासन आंबोली-चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करणार आहे.

दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारीनंतर आता आंबोली-चंदगड संवर्धन राखीव क्षेत्राची घोषणा लवकरच होणार आहे. त्यासाठी शासन आणि वन विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. मोर्ले येथे जनमत घेण्यासाठी वन विभागाची माणसे गेली होती; मात्र मोर्लेवासीयांनी संवर्धन राखीव क्षेत्राला विरोध दर्शवला आहे. त्यांनी तसे लेखी निवेदनही वन विभागाला दिले आहे. 

तिलारीपाठोपाठ शासन आंबोली-चंदगड संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करणार आहे. त्यात मोर्ले, तेरवण, तेरवण मेढे, तळकट, उगाडे, आडाळी, केर, भेकुर्ली, घोटगेवाडी, झोळंबे, पाळये, खडपडे, फुकेरी, सोनावल, मोरगाव आदी गावांचा समावेश असणार आहे. संवर्धन राखीव क्षेत्राचे नाव आंबोली-चंदगड असले तरी त्यात या सर्व गावांचा समावेश असणार आहे. 

जिल्ह्यातील सह्याद्री रांगातील इतर गावांप्रमाणे सावंतवाडी, चंदगड आणि दोडामार्ग तालुक्‍यातील अनेक गावे पश्‍चिम घाटात येतात. तो सगळा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न आहे. हत्ती, वाघ आणि इतर अनेक वन्यप्राणी, औषधी वनस्पती त्यात विपुल प्रमाणात आहेत. पर्यावरणदृष्ट्या तो भाग संवेदनशील असल्याने पशू, पक्षी आणि वनस्पतींचे जतन आणि संवर्धन करणे अत्यावश्‍यक आहे. तिलारी परिसरातील पशू, पक्षी आणि वनस्पतींचे जतन करण्याच्या दृष्टीने शासनाने 23 जून 2020 ला तिलारीला संवर्धन राखीव क्षेत्र घोषित केले. त्यानंतर आता आंबोली-चंदगड नावाने नवे संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्याच्या शासनाच्या हालचाली सुरू आहेत. 

दरम्यान, मोर्ले गावात वर्षानुवर्षे केली जाणारी कुमरी शेती संवर्धन राखीव क्षेत्र घोषित झाल्यास नष्ट होणार आहे. गावकऱ्यांचा 99 वर्षांचा करारही मोडीत निघणार आहे. तेथील सर्व्हे क्रमांक 44/1 मध्ये सुमारे एक हजार एकर (392 हेक्‍टर) राखीव वनक्षेत्र आहे. ते संवर्धन राखीव क्षेत्र घोषित करण्यास गावकऱ्यांचा विरोध आहे. लोकांची मते आजमावण्यासाठी आज मोर्लेत आलेल्या वन कर्मचाऱ्यांकडे सरपंच महादेव गवस, उपसरपंच पंकज गवस, गोपाळ गवस, संतोष मोर्ये आणि गावकऱ्यांनी संवर्धन राखीव क्षेत्रास विरोध दर्शवला. आपली भूमिका शासनाला कळवावी, अशी मागणी त्यांनी केली. 

वन विभागाची भूमिका चुकीची 
गणेशोत्सवाच्या गडबडीत वन विभागाची माणसे गावात येऊन मोर्ले संवर्धन राखीव क्षेत्राबाबत मते जाणून घेण्याचा अचानक प्रयत्न करतात, हे पूर्णतः चूक आहे. त्याला सगळ्या गावकऱ्यांचा विरोध आहे. तसे पत्र वनक्षेत्रपाल दयानंद कोकरे यांच्याकडे दिले आहे आणि सहायक उपवनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांना भेटून विरोध दर्शवला आहे. सगळे गावच आता संवर्धन राखीव क्षेत्राला विरोध करेल, अशी भूमिका मोर्ले ग्रामस्थ गोपाळ गवस यांनी मांडली. 

आंबोली-चंदगड संवर्धन राखीव क्षेत्राच्या संभाव्य घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर मोर्लेत वन कर्मचारी गेले होते. गावकऱ्यांनी राखीव क्षेत्राला विरोध केला. ते आम्ही वरिष्ठांना कळवणार आहोत.
- दयानंद कोकरे, वनक्षेत्रपाल, दोडामार्ग

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to Amboli-Chandgad Conservation Reserve