सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयासाठी दहा व्हेंटिलेटरसह इतर सुविधा

भूषण आरोसकर
Tuesday, 15 September 2020

माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात येथील विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी आमदार नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते आले होते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील उपजिल्हा रुग्णालयात दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर या रुग्णालयात अपुरी असणारी आरोग्य यंत्रणा पुरविली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी आज येथे पत्रकारांना दिली. 

जिल्हा रुग्णालयात काही अडचणी आहेत, त्या दूर करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात येथील विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या समस्या निवारण्यासाठी आमदार नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते आले होते. यावेळी आमदार नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधताना तसे सांगितले. या वेळी तालुकाप्रमुख रूपेश राऊळ व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

आमदार नाईक म्हणाले, ""जिल्हा रुग्णालयामध्ये कोविडच्या पार्श्‍वभूमीवर व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. काही अडचणी होत्या त्याही दूर करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी गेले सहा महिने डॉक्‍टर आणि आरोग्य यंत्रणा योद्‌ध्याप्रमाणे काम करत आहेत. कोविडबाबत देखील काळजी घेतली जात आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर व कर्मचारी सेवा देत आहेत आणि काही तज्ज्ञ डॉक्‍टर ऑनलाईन सेवा देत आहेत. मी कोविडचा रुग्ण म्हणून देखील रुग्णालयांमध्ये गेलो होतो आणि त्यावेळी डॉक्‍टर आणि कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा आपल्याला ज्ञात आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर सेवा कशी दिले जाते, हे मी सांगू शकतो.'' 

ते पुढे म्हणाले, ""येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दहा व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले आहेत. सावंतवाडीत जर कोण खासगी कोविड सेंटर सुरू करत असेल तरीदेखील त्याला पायाभूत सुविधा देण्याबाबत प्रशासन विचार करेल. येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये काही अडचणी आणि यंत्रणा कमी असल्यास त्या दूर केल्या जातील. त्याबाबत तालुकाप्रमुख राऊळ यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्याशी संवाद साधून त्याबाबतचे प्रस्ताव घ्यावेत. ते कोविड निधीतून मंजूर करून घेण्यासाठी मी प्रयत्न करणार.'' 

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांना पत्रकारांनी आमदार केसरकर केव्हा येणार याबाबत विचारणा केली असता, तालुकाप्रमुख राऊळ यांनी येत्या आठवडाभरात आमदार केसरकर येतील, असा विश्‍वास व्यक्त केला. ते म्हणाले, शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी कोविड योद्धा म्हणून काम करत आहेत. 

विरोधकांकडून दिशाभूल 
आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष मतदारसंघात आहे. सावंतवाडी मतदारसंघातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकारी हे संघटनेचे काम करत असताना कोविड योद्धा म्हणून चांगल्या प्रकारे काम करत आहेत; मात्र विरोधक लोकांची दिशाभूल करण्यात गुंतल्याचे देखील आमदार नाईक म्हणाले. आपण पत्रकार परिषद घेणार नाही, असे त्यांनी सांगून अन्य विषयावर बोलण्याचे टाळले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Other facilities including ten ventilators for Sindhudurg sub-district hospital