परराज्यातील नौकांकडून होऊ शकते मासळीची लूट

राजेश कळंबटे
Saturday, 17 October 2020

काही दिवसांपुर्वीच जयगड येथे आलेल्या शेकडो नौकांनी गणपतीपुळे येथे म्हाकुळ मारुन नेला. 

रत्नागिरी : पावसाने उघडीप दिली असली तरी अजून खोल समुद्रातील वातावरण जैसे थे असल्यामुळे जयगड येथे आलेल्या परराज्यातील मच्छीमारी नौका ठाण मांडून आहेत. बंदर विभागाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्या रवाना 
होणार आहेत.

हेही वाचा -  कमी खर्चात, कमी वेळेत मिळवा गुंठ्याला दोनशे किलो भात -

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्राला पावसाचा तडाखा बसला. शुक्रवारी वातावरण निवळू लागले आहे. पण वेगवान वाऱ्यांचा जोर आजही कायम होता. किनारी भागात त्याची तीव्रता अधिक होती. समुद्र खवळल्यामुळे गुजरात, केरळ, कर्नाटकसह मुंबई, हर्णैमधील सुमारे पाचशेहून अधिक नौका जयगड, लावगण येथील बंदरात आश्रयासाठी आलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली; मात्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती खोल समुद्रात जैसे थे आहे. 

समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारी नौका अजूनही जयगड बंदरातच उभ्या आहेत. हवामान विभागाकडून १७ ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस, वारा राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे समुद्र शांत झाला तर परराज्यातील त्या नौका रवाना होतील. बदलत्या वातावरणामुळे जिल्ह्यातील मासेमारी सलग तिसऱ्या दिवशी मासेमारी ठप्पच आहे. तीन दिवसात कोट्यवधीचे नुकसान मच्छीमारांना सोसावे लागले आहे.

हेही वाचा - यंदा आंब्याचा हंगाम लांबणार ? -

त्या नौकांकडून मासळीची लूट

आश्रयासाठी रत्नागिरीत येणाऱ्या नौकांकडून जिल्ह्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मासळीची लूट होते. काही दिवसांपूर्वीच जयगड येथे आलेल्या शेकडो नौकांनी गणपतीपुळे येथे म्हाकुळ मारून नेला. चारशेहून अधिक हॉर्सपॉवरच्या या नौकांवर मासळी पकडण्याची अत्याधुनिक यंत्रणा असते. त्या वेळी स्थानिक मच्छीमारांच्या हाती २५ ते ५० किलो म्हाकुळ लागत असताना त्या नौकांनी पाचपट मासळी मारली होती. पुढे आठ दिवस नौकांना मासळी मिळाली नव्हती. या वेळीही असे होऊ नये यासाठी पावले उचलण्याची शक्‍यता आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: other state the fate of fishing area in our konkan sea area in ratnagiri in cyclone situation