क्रियाशील मच्छीमारांना पॅकेजचा लाभ 

package benefits active fishermen konkan sindhudurg
package benefits active fishermen konkan sindhudurg
Updated on

मालवण (सिंधुदुर्ग) - "क्‍यार' व "महा'चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या 65 कोटी 17 लाख 20 हजारांच्या पॅकेजमधील प्रति कुटुंब एकच लाभ ही अट आता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच कुटुंबातील स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना मत्स्य पॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला झाला आहे. या अटीबरोबरच मत्स्यपॅकेजच्या लाभांसाठी राष्ट्रीयकृत बॅंकेतच खातं असण्याची अट देखील शिथिल केल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत खाती असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांनाही मत्स्यपॅकेजचा लाभ मिळू शकणार आहे. याबाबत नवा शासन निर्णयही काढण्यात आला असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली. 

राज्यातील सागरी मच्छीमारांना 2019-2020 च्या मासेमारी हंगामात वादळी हवामानामुळे जीवित व वित्त हानी होऊ नये यासाठी मासेमारी न करता परत यावे लागले होते. परिणामी त्यांना मासेमारी मधुन मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागले होते . अरबी समुद्रात निर्माण झालेल्या "क्‍यार' व "महा' चक्रीवादळामुळे तर मच्छीमारांचे आर्थिक कंबरडेच मोडले. या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी ऑगस्ट 2020 ला मत्स्य पॅकेजची घोषणा केली; परंतु या पॅकेजमधील काही निकष, अटी व शर्तींमुळे मच्छीमारांना या पॅकेजचे लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत होत्या. लोकप्रतिनिधी, मच्छीमार सहकारी संस्था, पारंपारिक मच्छीमार यांनी या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. 

कुटुंबातील केवळ एकाच पात्र लाभार्थास पॅकेजचे लाभ मिळण्याची तरतुद जुन्या शासन निर्णयाप्रमाणे होती. आता ही अट काढून टाकण्यात आलेली असून एकाच कुटुंबातील स्वतंत्र मासेमारी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यास व मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधीस नव्या निकषांप्रमाणे स्वतंत्र लाभाची तरतुद करण्यात आली आहे; परंतु पात्र लाभार्थी एकापेक्षा जास्त मच्छीमार संस्थांचा सभासद असल्यास त्याला कोणत्याही एकाच संस्थेतून, एकाच घटकाखाली पॅकेजचा लाभ मिळू शकेल. बहुतांश मच्छिमारांची खाती ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत असल्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकेत खातं असण्याची अट देखील शिथिल करण्यात आली आहे. 

पारंपरिक रापणकार/नौका मालकांच्या कुटुंबातील महिला मासे विक्री करत असल्यास त्या कुटुंबातील एका पात्र महिलेस 2 शितपेट्या देण्यात येतील तथापी त्या महिलेच्या नावे नौका असल्यास त्या महिला लाभार्थीस नौका अर्थसहाय्य किंवा शितपेटी यापैकी केवळ एकाच घटकाखाली लाभ मिळू शकेल. 

मत्स्यपॅकेजचा मार्ग सुलभ 
राज्याच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्रात 13,838 यांत्रिकी मासेमारी नौका व 1564 बिगर यांत्रिकी मासेमारी नौका अशा एकूण 15,402 मासेमारी परवानाधारक मासेमारी नौका आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 96 पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे रापणकर संघ आहे. आता निकषांमध्ये झालेल्या बदलांमुळे मत्स्यपॅकेजचा लाभ मिळण्याचा मार्ग सुलभ होणार आहे. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com