चिपळुणातील शेतात अवतरला हत्ती !

संदेश सप्रे
Monday, 27 July 2020

शेतातील या हत्तीला पाहून लोक अचंबित होत आहेत. गेले काही दिवस हत्ती शेतातच ठाण मांडून आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्‍यातील गणेशखिंड येथील रस्त्याच्या जवळील शेतात हत्ती अवतरला आहे. शेतातील या हत्तीला पाहून लोक अचंबित होत आहेत. गेले काही दिवस हत्ती शेतातच ठाण मांडून आहे. पण, थांबा! हा हत्ती खराखुरा नसून भात रोपांच्या सहाय्याने साकारला आहे. कृषी पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेने हा उपक्रम राबविला आहे.

गणेशखिंड येथील रस्त्यालगतच्या शेतात सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्यावतीने हा हत्ती साकारलाय. शेत नांगरून पेरणी करतानाच हत्तीच्या आकारात पेरणी केली. हत्ती रेखाटण्याचे काम चिपळूणचे कलाकार संतोष केतकर यांनी केले आहे. पाचाडचे माजी सरपंच बारकूशेट खोपडे यांनी आपले शेत या कलाकृतीसाठी दिले. भात रुजून वरती आल्यावर इतर भागात तांबडा माठ पेरण्यात आला आहे. 

हेही वाचा- आदिती तटकरे : वादळग्रस्तांच्या अडचणी समजून भरपाई द्या , कोणीही वंचित न ठेवण्याच्या प्रशासनाला सूचना -

ग्रामीण कृषी पर्यटनाला चालना;
अशा प्रकारची कलाकृती साकारून ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन वाढवावे, यासाठी हा प्रयत्न केला. जगात पॅडी आर्ट प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. तिचा प्रचार, प्रसार व्हावा व पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात आर्थिक स्रोत निर्माण व्हावेत, असा संस्थेचा प्रयत्न आहे. ही कलाकृती साकारण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते राम मोने, भाऊ काटदरे, नितीन नार्वेकर, गजानन सुर्वे, सागर रेडीज, राजेंद्र हुमरे, सोहम घोरपडे, निकेत नार्वेकर यांनी परिश्रम घेतले. ही कलाकृती शेतात उभे राहून पाहिली तर फक्त वाढलेले भात दिसते; परंतु उंचावरून पाहिले तर कलाकृती उत्तम दिसते. यासाठी शेताशेजारी एका झाडावर मचाण 
बनविण्यात आले.त्यावरून उत्तम फोटो काढले गेले आहेत.

हेही वाचा-मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत जिल्हावासीयांच्या आशीर्वादाने मी ठणठणीत  : उदय सामंत - 

 कोरोना झाल्याचे जाहीर केले; मात्र.....

सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे पॅडी आर्ट..

संस्थेच्यावतीने या वेळी फक्त एकाच रंगाच्या भाताचे चित्र साकारले आहे; परंतु पुढील वर्षी ३ ते ४ रंगांचे भात बियाणे वापरून उत्तम प्रकारचे चित्र साकारले जाईल. या प्रकारची कलाकृती गावात साकारण्याची इच्छा असणाऱ्यांनी सह्याद्री निसर्ग मित्रशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

संपादन - अर्चना बनगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paddy Art by Sahyadri Nature Friend elephant landed farming in Chiplun ratnagiri