पाडलोसवासीयांसाठी आनंदाची बातमी, गतवर्षीच्या भरपाईबाबत `हा` निर्णय

निलेश मोरजकर
Sunday, 9 August 2020

शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेतली असता चतुर्थीच्या अगोदरच संबंधितांना भरपाई मिळणार असे सांगितले. 

बांदा (सिंधुदुर्ग) - गतवर्षी ऑगस्ट-ऑक्‍टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाडलोस गावातील 114 शेतकऱ्यांच्या भातपीक व फळपिकांचे 3 लाख 89 हजार 280 रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई मिळणार असे प्रशासनाकडून वारंवार सांगून कागदोपत्री खेळ करूनही अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता; परंतु शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची भेट घेतली असता चतुर्थीच्या अगोदरच संबंधितांना भरपाई मिळणार असे सांगितले. 

वाचा - 'ही' शिवेसनेची जुनी खोड; निलेश राणेंची टीका 

सावंतवाडी तालुक्‍यात ऑगस्ट-ऑक्‍टोबर 2019 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे कापणीयोग्य झालेले भातपीक व फळपीक जमीनदोस्त झाले होते. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी व महसूल विभागाने पिकांचे पंचनामेदेखील केले; मात्र आठ ते दहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी सुद्धा आजतागायत 114 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने नुकसानग्रस्तांनी मळेवाड युवासेना विभागप्रमुख समीर नाईक व सावंतवाडी भाजपा युवासरचिटणीस काका परब यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी शेतकऱ्यांना घेऊन तत्काळ तहसीलदारांची भेट घेतली. महेश नाईक, सप्रेम परब, बंड्या कुबल, सिद्धेश सातार्डेकर, सिद्धेश कोरगावकर उपस्थित होते. 

हेही वाचा - सलाम या बळीराजाला! बैलांसाठी जीव धोक्‍यात, अनोख्या नात्याचे दर्शन  

आठवड्यात दोन दिवस तलाठी 
सातबारा, आठ अ, वारस नोंदणी आदी कामांसाठी तलाठ्यांची गरज असते; परंतु मडुरा तलाठी कार्यालयात पाडलोससाठी तलाठी नसल्याने सावंतवाडी कार्यालय गाठावे लागते. याकडे काका परब व समीर नाईक यांनी तहसीलदारांचे लक्ष वेधले असता आठवड्यातून दोन दिवस पाडलोससाठी मडुऱ्यात तलाठी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

संपादन - राहुल पाटील 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Padlos people will get compensation for last year's loss