पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी मांगलेकर लाचलुचपतच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी मांगलेकर लाचलुचपतच्या जाळ्यात

पन्हाळा पंचायत समितीतील लेखा विभागात कार्यरत असलेला सहाय्यक लेखाधिकारी अरुण रघुनाथ मांगलेकर यांना तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले.

पन्हाळा पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी मांगलेकर लाचलुचपतच्या जाळ्यात

आपटी - पन्हाळा पंचायत समितीतील लेखा विभागात कार्यरत असलेला सहाय्यक लेखाधिकारी अरुण रघुनाथ मांगलेकर (वय-५५, राहणार मनोरमा नगर, देवकर, पाणंद, कोल्हापुर) यास बीलाची फाईल विना त्रुटी पुढील कार्यवाहीकरीता पाठविण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले. ही कारवाई पंचायत समिती कार्यालयात करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी सांगितले.

याबाबत लाच लुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी सातवे, ता. पन्हाळा गावातील रस्त्याचे व मौजे आरळे, ता. पन्हाळा गावातील गटारीचे अशी सहा लाखाचे काम पूर्ण केले. सदर कामांच्या बीलाची फाईल तयार करून त्याची रक्कम मिळणेबाबतचा प्रस्ताव पन्हाळा पंचायत समितीत सादर केला. त्यानंतर येथील लेखा विभागात कार्यरत संशयित सहायक लेखाधिकारी अरूण मांगलेकर याची तक्रारदारांनी भेट घेतली. तेव्हा मांगलेकर याने संबधित बीलाची फाईल तपासून विना त्रुटी पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्याकरीता तक्रारदार यांचेकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी केली.

याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करून विभागाने पन्हाळा पंचायत समिती येथे सापळा लावून तीन हजारांची लाच घेताना मांगलेकर याला रंगेहात पकडल्याचे पोलिस निरीक्षक नितीन कुंभार यांनी सांगितले. त्याच्यावर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, पुणे राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव व आदिनाथ बुधवंत पोलीस उपअधीक्षक कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, पोलीस उप निरीक्षक बंबरगेकर पो. ना. सुनिल घोसाळकर, व पो. कों. मयूर देसाई, रूपेश माने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांनी केली.