परब बंधू कोचरेत जोपासताहेत मूर्तिकलेचा वारसा 

अजय सावंत
Tuesday, 18 August 2020

हे दोघे बंधू त्यांच्या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत. वडील (कै.) नारायण परब हे मुंबई कुलाबा येथे सुप्रसिद्ध मूर्तिकार होते. वडिलांच्या निधनानंतर या दोन्ही बंधूनी आपला पेशा सांभाळून मूर्तीकलेत अनेक प्रयोग करताना आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा जोपासून वाटचाल केली

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - कोचरे मायनेवाडी येथील मूर्तिकलेचा वारसा जोपासणारे डॉ. महादेव परब व दिनेश परब हे दोघे बंधू आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा गावामध्ये जोपासत आहेत. 
गणेश मूर्तिकार डॉ. महादेव व दिनेश परब हे दोघे कुडाळ नाबरवाडी येथे तसेच कोचरा येथे गणेश मूर्ती बनवत आहेत. त्यांच्या मूर्तीशाळेत असंख्य आकर्षक गणेशमुर्त्या चिकित्सक ग्राहकांचे गणेशभक्त यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

हे दोघे बंधू त्यांच्या घराण्याचा वारसा पुढे चालवत आहेत. वडील (कै.) नारायण परब हे मुंबई कुलाबा येथे सुप्रसिद्ध मूर्तिकार होते. वडिलांच्या निधनानंतर या दोन्ही बंधूनी आपला पेशा सांभाळून मूर्तीकलेत अनेक प्रयोग करताना आपल्या वडिलांच्या कलेचा वारसा जोपासून वाटचाल केली. हे निश्‍चितच कौतुकास्पद आहे.

यासाठी त्यांना सिद्धेश चव्हाण, गणेश राऊळ, सखाराम चव्हाण, विनीत सावंत यांचे सहकार्य लाभत आहे. सुकळवाड येथील सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार श्री. परब पेंटर यांना हे दोघे बंधू आदर्श मानतात. गणेश भक्तासाठी आकर्षक मुर्त्या देण्याचे काम हे दोघे बंधू करत आहेत. कोरोनाचे जागतिक संकट गेले सहा महिने आहे. या संकटाना अनेकजण सामोरे जात आहेत. आपला सिंधुदुर्ग जिल्हासुद्धा या कोरोना संकटातून सुटलेला नाही. 

कोकणवासीयांचे आराध्य दैवत श्री गणेशाचे आगमन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना येथे प्रत्येक गणेश मूर्तिकार गणेश भक्तांना आकर्षक गणेशमुर्त्या देण्यासाठी सज्ज झाला आहे. कोरोनामध्ये विविध साहित्याची कमतरता असताना सुद्धा गणेश भक्तांना मूर्ती देऊन वाढत्या महागाईमध्येसुद्धा गणेश भक्तांना कमी किमतीत मुर्त्या देऊन गणेश मूर्तिकारानी आपल्या कलेतून सामाजिकतेचे दर्शन घडविले आहे. यावर्षी कोरोनामुळे गणेश मूर्ती किती फूट उंच असाव्यात या अनुषंगाने गणेश मूर्तिकार व गणेशभक्त प्रशासनाच्या नियमांस अधीन राहून गणेश मूर्ती घडवीत आहेत. त्याला गणेशभक्तांचा सुद्धा प्रतिसाद मिळत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parab Brothers Preserve Making Of Ganesh Idol In Kochare