महाविकास आघाडी निष्क्रीय ः उपरकर

तुषार सावंत
Saturday, 28 November 2020

येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ""निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने जिल्ह्यातील शिवसेना लोकप्रतिनिधींनी दिली होती

कणकवली (सिंधुदुर्ग) - राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार केवळ आश्वासने देत आहे. वर्षपुर्ती होत असताना हे सरकार निष्क्रिय ठरले आहे. केवळ कोरोनाचे कारण पुढे करून जनतेचा भ्रमनिरास केल्याची टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली. 

येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ""निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने जिल्ह्यातील शिवसेना लोकप्रतिनिधींनी दिली होती; परंतु जनतेला दिलेला शब्द त्यांनी पाळलेला नाही. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणा निष्क्रिय ठरली. जागोजागी जनतेची लुट या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे.

शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा असो किंवा नुकसान भरपाई असो वीज बिलाबाबत ही ग्राहकांना कोणतीही सवलत मिळालेली नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. असे सरकार आणि मंत्री सांगत आहे; मात्र जनतेच्या पदरात काही पडत नाही. कोरोना काळात लोकप्रतिनिधींनी आरोग्य यंत्रणेराहून मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारने या काळात भरणा केलेले आरोग्य कर्मचारी सध्या कमी केले जात आहेत. भविष्यात कोरोनाची दुसरी लाट आली तर असलेल्या आरोग्य यंत्रणा मोठा ताण येणार आहे. जे आरोग्य कर्मचारी आठ महिने जीवावर उध्दार होऊन कोरोना रुग्णांशी लढत होते. त्यांना गेल्या आठ महिन्यात वेतनही दिलेले नाही.'' 

लोकप्रतिनिधींकडून निराशा 
मच्छीमारांचे प्रश्‍न, कबुलायतदार गावकर, आकारीपड, वनसंज्ञा हे प्रश्न जैसे थे आहेत. जिल्ह्याच्या दोडामार्ग तालुक्‍यात हत्तींमुळे मोठे नुकसान होत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत. हत्ती पार्क ही एक वेगळी गोष्ट आहे. एकूणच या घोषणा सरकारच्या कालावधीतील आहेत. जिल्ह्यातील जनतेने ज्या लोकप्रतिनिधींना अपेक्षेप्रमाणे निवडून दिले. त्या जनतेची या लोकप्रतिनिधींनी घोर निराशा केल्याची टीका उपरकर यांनी केली. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parashuram Upkar criticizes the government