भाजपकडून मच्छीमारांची फसवणूक

भाजपकडून मच्छीमारांची फसवणूक

मालवण - मच्छीमारांच्या संघर्ष सभेत बहिष्काराचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी मच्छीमारांची मुख्यमंत्र्याशी भेट घडवून देऊ असे म्हटले आहे. मच्छीमार त्यांचे तोंड बघून समाधान मानणार का? गेल्या साडे चार वर्षात त्यांनी मुख्यमंत्र्याकडे मच्छीमारांच्या प्रश्‍नांबाबत पाठपुरावा का केला नाही. त्यामुळे यातूनही मच्छीमारांची फसवणूक केली जात असल्याचा आरोप मनसेचे राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. रेवतळे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

श्री. उपरकर म्हणाले, मच्छीमारांच्या संघर्ष मेळाव्यात पर्ससीनच्या मासेमारीबाबत जी भूमिका मांडण्यात आली ती वस्तुस्थिती आहे. या भागाचे गेली पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी पारंपरिक मच्छीमारांना वार्‍यावर सोडण्याचे काम केले. फयान वादळातील नुकसानीच्या भरपाईसाठी पावत्यांची अट घातल्याने चार कोटीचे अनुदान मागे गेले. तत्कालीन पालकमंत्र्यांनी पर्ससीनच्या मासेमारीस साथ दिल्यानेच आज ही वेळ पारंपरिक मच्छीमारांवर आली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीत मच्छीमारांनी बदल घडवून आणला. मात्र त्यानंतर सत्तेत असलेल्या खासदार, आमदार, पालकमंत्र्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी केवळ मंत्र्यांच्या भेटी घेण्याचे काम केले. प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही. पारंपरिक मच्छीमारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच सध्याच्या सत्ताधार्‍यांविरोधात मच्छीमारांमध्ये चीड निर्माण झाली आहे. मी आमदार असताना मच्छीमारांच्या प्रश्‍नासंदर्भात सभागृहात आवाज उठविला. शेतकर्‍यांप्रमाणेच मच्छीमारांना सुविधा मिळाव्यात, शून्य टक्के व्याजदराचे कर्ज मिळावे, मत्स्यदुष्काळ जाहीर करावा, मत्स्योत्पादन जाहीर करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते ती ब्रिटिश कालीन असल्याने ती बदलण्याची कार्यवाही करावी यासारख्या समस्यांवर आवाज उठविला. 

पर्ससीनधारकांना खासदारांनीच केंद्रात नेले. यात त्यांनी केलेल्या मागणीमुळेच समुद्रात मासेमारीसाठी जाणार्‍या नेपाळ्यांना बायोमेट्रीक कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्यक्षात नेपाळ्यांचा समुद्राशी कोणताही संबंध नाही. खासदारांनी केलेल्या मागणीमुळेच नेपाळ्यांना बायोमेट्रीक कार्ड देण्यात आली असल्याचा आरोप करत त्याबाबतचे पुरावेच त्यांनी सादर केले. पारंपरिक मच्छीमारांनी आतापर्यंत अनेक पक्षांकडे पाठपुरावा केला. मात्र त्यांना यश, दिलासा मिळाला नाही. त्यामुळे आता मच्छीमारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यास ते हा प्रश्‍न निश्‍चितच सोडवतील, राज्यातील अनेक महत्त्वाचे प्रश्‍न त्यांनी सत्ताधार्‍यांवर दबाव टाकून सोडविले आहेत. आमची सत्ता नसली तरी दबाव आहे. त्यामुळे श्री. ठाकरे यांच्या माध्यमातून मच्छीमारांचा हा प्रश्‍नही सुटेल असे श्री. उपरकर यांनी स्पष्ट केले. 

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष शैलेश अंधारी, तालुकाध्यक्ष विनोद सांडव, गणेश वाईरकर, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, पास्कोल रॉड्रिक्स, भारती वाघ, गुरू तोडणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com