उद्‌घाटने करून पालकमंत्री, खासदारांकडून जनतेची फसवणूक; उपरकरांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 September 2019

कणकवली - निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री, खासदार विविध विकासकामांची उद्‌घाटने करून जनतेची फसवणूक करीत आहेत, असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.

कणकवली - निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री, खासदार विविध विकासकामांची उद्‌घाटने करून जनतेची फसवणूक करीत आहेत, असा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केला.

पाच वर्षांपूर्वी याच पालकमंत्री आणि खासदारांनी ट्रामा केअर सेंटर सुरू करण्याची आश्‍वासने दिली होती. मात्र मागील पाच वर्षांत त्यांनी ट्रामा केअर सेंटरकडे ढुंकूनही पाहिलेले नाही, असे ते म्हणाले. येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री. उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोळकर उपस्थित होते.

श्री. उपरकर म्हणाले, ""पालकमंत्र्यांनी नुकतेच सावंतवाडीत मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन केले. एवढेच नव्हे तर पुढील दीड वर्षात हे रुग्णालय पूर्ण होईल, अशी देखील ग्वाही दिली. याच पालकमंत्र्यांनी पाच वर्षांपूर्वी कणकवलीत, सावंतवाडीत ट्रामा केअर सेंटर कार्यान्वित करण्याची ग्वाही दिली होती; पण ही केंद्रे अजूनही सुरू झालेली नाहीत.'' 

ते म्हणाले, ""पाच वर्षांपूर्वीच्या सरकारमधील लोकप्रतिनिधींनी कुडाळ येथे महिला रुग्णालयाचे भूमिपूजन केले होते; मात्र निधी नसल्याने हे रुग्णालय अजूनही सुरू झालेले नाही. याच धर्तीवर चांगले डॉक्‍टर्स नसल्याने जिल्हा, उपजिल्हा रुग्णालये ओस पडत आहेत. इथल्या रुग्णांना अजूनही मुंबई, गोवा, कोल्हापूरला धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे मल्टिस्पेशल रुग्णालय होईल तेव्हा होईल. आधी शासकीय रुग्णालयांत पुरेसे डॉक्‍टर्स द्या, अशी आमची मागणी आहे. सिंधुदुर्गनगरीत आयुष रुग्णालय सुरू करण्याची घोषणा खासदारांनी केली आहे; मात्र या रुग्णालयासाठी आवश्‍यक तो भूखंड उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे आयुष रुग्णालय सुरू होण्याबाबत अनेक अडचणीत आहेत, असे ते म्हणाले. 

सर्वसामान्यांसाठी विमान कधी? 
उपरकर म्हणाले, ""चिपी विमानतळावर निवडणूक काळात विमान उतरेल, असा विश्‍वास पालकमंत्री व्यक्‍त करत आहेत. निवडणूक काळात राजकीय नेतेमंडळींसाठी विमान येऊ शकते; पण सर्वसामान्य प्रवाशांना घेऊन विमान कधी उडणार? हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे.''  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parshuram Uparkar comment on Trama care center