रत्नागिरीत दुसऱ्य़ांदा घडला प्रकार : नातेवाईक आक्रमक, कोरोनाबाधित गर्भवती महिलेला नेताना विरोध, अखेर पोलिस यंत्रणा आली धावून अन्....

राजेश शेळके
Tuesday, 28 July 2020

पेठकिल्ला येथील प्रकार;पोलिस यंत्रणा आली धावून...

रत्नागिरी :  कोरोना बाधिताला जिल्हा कोविड रुग्णालयात नेण्यावरून पुन्हा नातेवाईकांनी विरोध केला. शहरातील पेठकिल्ला-पठाणवाडी येथे काल दुपारी हा प्रकार घडला. अखेर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीला पोलिस यंत्रणा धावून आली. त्यांनी डॉ. आश्‍फाक काझी यांना मध्यस्थी घातले. त्यांनी नातेवाईकांना समजावून रुग्णाला रुग्णालयात दाखल केले. 

 

शहरातील पेठकिल्ला-पठाणवाडीत रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला. त्याला आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना तेथील नागरिकांनी रोखले. सोमवारी रुग्णालयात आणून सोडतो, आता आम्ही सोडणार नाही, असे सांगत नातेवाईकांनी नेण्यास विरोध केला. आज सकाळीही संबंधित रुग्ण दाखल न झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम पुन्हा पठाणवाडी येथे गेली. मात्र आम्ही सिव्हिलला रुग्ण पाठवणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा, असा नातेवाईकांनी इशारा दिला. 

हेही वाचा- सुखद बातमी! महिला हाॅस्पिटलप्रश्नी खासदार म्हणाले... -

यावेळी शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी डॉ. अश्‍फाक काझी यांना मध्यस्ती घातले. त्यांनी याचे गांभीर्य रुग्णांच्या नातेवाईकांनी समजावून सांगितले आणि विनंती केली. त्यानंतर रुग्णाला नेण्यास नातेवाईकांनी परवानगी दिली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाधितांना तत्काळ उपाचार मिळावा, यासाठी आरोग्य यंत्रणा राबत आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता राबणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना विरोध केला जात आहे. 

हेही वाचा-ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, कुठल्या जिल्ह्यातील ही स्थिती? -

त्यांच्या अंगावर धावून जाऊन धक्काबुक्की केल्याचे प्रकारही घडले. नाटे येथेही असाच प्रकार झाला. राजिवडा येथील कोरोनाबाधित गर्भवती महिलेला नेण्यावरून विरोध झाला. कोरोना योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लक्ष करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यासाठी प्रशासनाला नागरिकांमधील गैरसमज दूर करून कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची आवश्‍यकता आहे. 

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pethkilla Pathanwadi Corona suffered at District Covid Hospital police rushed to the aid of the health workers