लोणेरे : पेट्रोकेमिकल संस्थेचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

lonere
lonere

लोणेरे (रायगड) : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा एक भाग असणाऱ्या पेट्रोकेमिकल इंजीनियरिंग संस्थेचे प्रत्यक्ष हस्तांतरण गेली चौदा वर्षे रखडले आहे. त्यामुळे या संस्थेवर नियंत्रण तंत्रशिक्षण संचालनालयाचे की विद्यापीठाचे हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. 

संस्थेतील 41 शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यापीठा कडून अपेक्षित सेवा मिळत नसलयाच्या कारणावरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. 11 मे 1992 च्या शासननिर्णयानुसार जागतिक बँक प्रकल्पांतर्गत पेट्रोकेमिकल इंजिनिअरींग इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापन, मालमत्ता, दायीत्व व जबाबदाऱ्यांसह हि संस्था विद्यापीठाकडे वर्ग करण्यात यावी असा आदेश देण्यात आला.त्यानुसार पेट्रोकेमिकल संस्था 2004 मधील करारानुसार विद्यापीठात विलीन झाली आहे. मात्र अद्यापही या संस्थेवर तंत्रशिक्षण संचालकांचे नियंत्रण आहे. यावर कोणताही ठोस निर्णय अद्याप झाला नाही, असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. शासनाचे तंत्रशिक्षण संचालनालय व राज्य सरकार यांच्या अनास्थे मुळे हा प्रश्न बारा वर्ष रखडला आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधी देखील गांभीर्याने पाहत नसल्याने असंतोष वाढला आहे. परिणामी  येथील कर्मचाऱ्यांनी 'करो या मरो' अशी भूमिका घेत बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये कर्मचाऱ्यांनी सलग 29 दिवस उपोषण केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा भाग म्हणून सन 1981 मध्ये कोंकणातील लोणेरे येथे 'रायगड पॉलिटेक्निक' संस्था स्थापन करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला. सन 1982 मध्ये लोणेरेत प्रत्यक्ष केमिकल अभियांत्रिकी डिप्लोमा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला. डॉ. आंबेडकर विद्यापीठाची स्थापना सन 1989 मधील कायद्यान्वये करण्यात आली. त्या नंतर मे 1992 मध्ये घेतलेल्या शासन निर्णयानुसार 'रायगड पॉलिटेक्निक' हे ''इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग' (आयओपीई) मध्ये रूपांतरित करण्यात आले. तसेच या संस्थेचे स्वतंत्र अस्तित्व न ठेवता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश शासना कडून देण्यात आले होते; मात्र अद्यापही विद्यापीठ या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सावत्र पणाची वागणूक देते आहे.

कागदोपत्री विलीनीकरण झालेले असताना प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप पदविका अभ्याक्रमातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केला. पदविका आणि पदवी, पदव्युत्तर अभियांत्रिकी अभ्याक्रमासाठी दोन इमारती अस्तित्वात आहेत. मात्र संस्थेचे विलीनीकरण झालेले असताना पदविका व पदवी विभागा अंतर्गत परस्पर बदल्या, पदभरती,  'टेक्विप' नुसार  प्रशिक्षण अशा शैक्षणिक बाबींचा लाभ पदविका विभागातील शिक्षकेतर कर्मचारीं याना मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी तंत्रशिक्षण विभागातील सुप्रिया घोटाळे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही. 

पदविका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी मंत्रालयात वारंवार चौकशी करतो. विद्यापीठाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून मंत्रालयात हे प्रकरण प्रलंबित आहे.
- प्रा विलास गायकर, कुलगुरू, डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम इंजिनियरींगच्या समावेशाबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाईल. या प्रश्नाबाबत कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. 
- अॅड. निरंजन वसंत डावखरे, आमदार, भाजप, कोकण पदवीधर मतदारसंघ

विद्यापीठ आणि शासनाच्या वतीने तंत्रशिक्षण संचालनालय यांच्यात झालेल्या कारारनाम्यानुसार मंजूर पदे विद्यापीठात वर्ग झाल्याचा शासन निर्णय त्वरित निर्गमीत करावा.
- अनिल कुभांर,अध्यक्ष, कर्मचारी संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com