अन् एसटीसमोर गुडघे टेकून ते ढसाढसा रडले 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

हा फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाचं काळीज हेलाविल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारणही तसचं आहे. 

सिंधुदुर्ग : कोरोनासारख्या महामारीने जगभरात थैमान घातले आहे. याचा फटका जगभरातील प्रत्येक घटकावर झाला आहे. प्रवाशांची जीवनदायीनी असलेल्या एसटी महामंडळालाही त्याचा जबरदस्त फटका बसला आहे. मार्च महिन्यापासून या लालपरीची चाके फिरली नाहीत. परंतु, याच लालपरीची सेवा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाचं काळीज हेलाविल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारणही तसचं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमधील व्यक्ती  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले एसटी महामंडळात वाहक पदावर कार्यरत होते. ते एसटीच्या समोर बसून हात जोडून ढसाढसा रडत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या फोटोमागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या या रडण्याचे कारणही पुढे आले आहे. सी. बी. जाधव हे आपल्या कामावर जीवापाड प्रेम करणारे वाहत पदावर कार्यरत होते. परंतु, ३१ जुलै रोजी जाधव सेवा निवृत्त झाले.   

हे पण वाचा तोतया सीआयडी इन्स्पेकटर युवतीने अनेकांना घातला लाखो रूपयांचा गंडा पण...

 

सेवेतून निवृत्त होत असताना ज्या एसटी बसने आपल्याला चार पैसे दिले, आपल्या संसाराचा गाडा सांभाळला, त्याच एसटीचा निरोप घेताना जाधव यांचे डोळे पाणावले.  निरोप घेताला जाधव एसटीसमोर गुडघ्यावर बसून ढसाढसा रडले होते. त्यांचा हाच मन हेलावून टाकणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोकरीवर प्रचंड निष्ठा असणाऱ्या जाधव यांना लालपरीचा निरोप घेताना भावना अणावर झाल्या. साहजिकच त्यांनी एसटी बससमोर गुडघे टेकून तिला हात जोडून अश्रुंना वाट मोकळी करून दिली. यावेळी जाधव हे अक्षरक्ष:ढसाढसा रडले. त्याच क्षणी त्यांच्या सहाकाऱ्यांनी हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद केला. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: photo viral for retired st employees from vengurle st depot