सिंधुदुर्गात 46,964 कुटुंबांना नळ जोडणी

नंदकुमार आयरे
Tuesday, 26 January 2021

जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झाली.

सिंधुदुर्गनगरी -  जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 11 कोटी 16 लाख प्राप्त निधीतून आतापर्यंत 4 कोटी 86 लाख निधी खर्चून जिल्ह्यातील 46 हजार 964 कुटुंबांना नळ जोडणी केली असल्याची माहिती आजच्या जलव्यवस्थापन समिती सभेत दिली. 
जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीची सभा अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आज झाली.

समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिक्षण व आरोग्य सभापती सावी लोके, वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, सदस्य संजना सावंत, श्‍वेता कोरगावकर, संजय आग्रे, प्रमोद कामत उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या बैठकीत दोडामार्ग तालुक्‍यात आडाळी - डेगवे नळपाणी योजना काम गेले अनेक महिने सुरू आहे. या नळपाणी योजनेच्या पाईपलाईनचा त्रास बांदा, दोडामार्ग परिसरात जाणाऱ्या लोकांना होत आहे. पावसाळ्यात पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात होऊन नुकसानी झाली.

सध्या या नळपाणी योजनेच्या कामाबाबत जीवन प्राधिकरण अभियंत्यांकडून डोळेझाक होत असून जीवन प्राधिकरण विभागाने या संबंधित बिले ठेकेदाराला दिली मग या कामाकडे लक्ष देणार कोण? याला जबाबदार कोण ?असा प्रश्‍न सभेत सदस्यांनी उपस्थित केला. वारंवार आंदोलने, मोर्चा, उपोषणे झाली. तरीही कामाची परिस्थिती जैसे थे आहे. संबंधित ठेकेदाराला बिले आदा केली कोणी ? असे संतप्त सवाल करत जनतेला मात्र याचा त्रास भोगावा लागत आहे. पाणी कधी मिळेल हे सांगता येत नाही; परंतु गेल्या वर्षभरात या कामाबाबत दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी सदस्याने केल्या व या कामाबाबत संबंधित अभियंत्यांची काम पूर्ण करण्याबाबत मानसिकता नसल्याचे विशद करत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. 

कळणे व त्या परिसरातील मायनींगमुळे येथील जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित करूनही प्रशासनाकडून लक्ष दिले जात नाही. 300 ते 400 मीटर मायनिंग आतमध्ये असूनही पाणी पुरवठ्याच्या योजनांवर परिणाम होत आहे. रस्त्यांचीही दुरावस्था झाली आहे. याबाबत प्रशासनाकडे यापूर्वी लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याबाबत अध्यक्षांनी हा प्रश्‍न प्रदूषण कंट्रोल बोर्डाकडे तातडीने ठराव करून सादर करा, असे आदेश दिले. 

देवगड विजयदुर्ग नळपाणी योजनेच्या पाणीपट्टीच्या प्रश्‍नाबाबत विजयदुर्ग नळपाणी योजनेची 3 लाख 16 हजार पाणीपट्टी वसूल झाली असून देवगड प्रादेशिक नळ योजनेची मात्र पाणीपट्टी वसूल नाही, लाईट बिल, कर्मचारी पगार यावर लाखो रूपये निधी खर्च झाला आहे, अशी माहिती सभेत दिली. 

यांत्रिकी विभागाकडील 16 कंत्राटी कर्मचारीमधील 3 कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनाच्या व कायम करण्याबाबतचा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांची कार्यवाही सुरू आहे; परंतु यातील दोन कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. या विभागाकडे कर्मचाऱ्यांची नितांत आवश्‍यकता आहे. याकडे सभेत लक्ष वेधले तर 8 महिन्यासाठी तरी एक वाहनचालक आणि दोन यांत्रिकी कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नेमावे, अशी मागणी सदस्यांनी केली. दूषित पाणी नमुने तपासणी कार्यक्रमात 990 पाणी नमुने तपासणीत 74 पाणी नमुने दूषित आल्याचे सांगण्यात आले. 

शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत नळजोडणी करण्याचा उद्देश ठेवून ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत यावर्षी जिल्ह्यात 1 लाख 18 हजार 507 कुटुंबांना नळ जोडणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आतापर्यंत 46 हजार 964 कुटुंबांना नळजोडणी पूर्ण केली आहे. या योजनेसाठी 11 कोटी 16 लाख रुपये निधी प्राप्त असून आतापर्यंत 4 कोटी 86 लाख रुपये निधी खर्च करून 39 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. 
- श्रीपाद पाताडे, पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pipe connection 46,964 households sindhudurg district