कुडाळ बसस्थानकात "क्रिकेट खेळो' आंदोलन 

अजय सावंत
Sunday, 29 November 2020

अडीच कोटीचे बसस्थानक, की गुरांचा गोठा? असा संतप्त प्रश्‍नही नाडकर्णी यांनी उपस्थित केला. या वेगळ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले. 

कुडाळ (सिंधुदुर्ग) - गांधीचौक येथे उभारलेल्या नवीन बसस्थानकाचे अद्याप लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे. डी. ऊर्फ बनी नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज या बसस्थानक आवारात "क्रिकेट खेळो आंदोलन' छेडण्यात आले. अडीच कोटीचे बसस्थानक, की गुरांचा गोठा? असा संतप्त प्रश्‍नही नाडकर्णी यांनी उपस्थित केला. या वेगळ्या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष वेधले. 

श्री. नाडकर्णी यांच्यासह मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब व राजन दाभोलकर, एसटी संघटना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, अनिल केसरकर, मालवणचे गणेश वाईरकर, कणकवली तालुका सचिव संतोष कुडाळकर, रमाकांत नाईक, सिद्धेश खुटाळे आदींसह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅट व बॉल हातात घेत क्रिकेट खेळत तसेच बॅनरबाजी करीत एसटी प्रशासनाचे लक्ष वेधले. 

श्री. नाडकर्णी म्हणाले, ""या बसस्थानकाच्या चुकीच्या कामाबाबत मनसे वेळोवेळी आवाज उठवत आहे. सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून याठिकाणी नवीन बसस्थानकाची इमारत उभारली आहे; मात्र अद्याप त्याचे लोकार्पण केलेले नाही. दिवाळीपूर्वी या बसस्थानकाचे लोकार्पण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी वेळोवेळी एसटी प्रशासनाकडे केली होती; मात्र अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसस्थानक आवारात सायंकाळच्या वेळी मच्छीमार्केट भरत आहे. गुरे ठाण मांडून बसत आहेत. खासगी वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत आहे. नवीन इमारत धुळ खात पडली आहे.

बसस्थानकाचे लोकार्पण दिवाळीपूर्वी न केल्यास याठिकाणी क्रिकेट स्पर्धा भरवली जाईल, असा इशारा यापूर्वीच दिला होता. त्याची सुरूवात आज क्रिकेट खेळून करण्यात आली. प्रशासनाने तत्काळ बसस्थानकाचे लोकार्पण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अन्यथा यापुढील काळात भव्य क्रिकेट स्पर्धा भरविलीच जाईल. तीव्र आंदोलनेही केली जातील.'' श्री. दाभोलकर म्हणाले, ""बसस्थानकाचे चुकीच्या पद्धतीने बांधकाम झाले आहे. लोकार्पण न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे; मात्र सत्ताधारी मंडळी दिखावेपणा करीत आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदारांचा एसटीसह कोणत्याही अधिकाऱ्यांवर वचक नाही. एसटी प्रशासनाने तातडीने बसस्थानकाचे लोकार्पण न केल्यास प्रसंगी मनसे स्टाईल खळखट्याक दणका देऊन जाग आणली जाईल.'' 

प्रशासनाकडून आंदोलनाची दखल 
बनी नाडकर्णी हे सातत्याने कुडाळच्या प्रश्‍नांसाठी आवाज उठवीत आहेत. 15 दिवसांपूर्वी त्यांनी या ठिकाणी क्रिकेट खेळणार असल्याचे जाहीर करून आज क्रिकेट खेलो आंदोलन छेडले. एसटी प्रशासनाला धारेवर धरीत जाब विचारला. आगारप्रमुख सुजित डोंगरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत बसस्थानक इमारतीवर घड्याळ बसविण्याचे काम बाकी आहे. लवकरच बसस्थानकाचे उद्‌घाटन केले जाईल, असे आश्‍वासन दिले.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Play cricket" movement at Kudal bus stand