तीच्या नावे आले पीएम सहायता निधीचे पत्र.. पण पोस्ट कार्यालयानेच केले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PM Assistance Fund soliloquy post office in sindudurg kokan marathi news

भाग्यश्री सातोस्कर ही गेली चार महिने ब्लड कॅन्सरने आजारी होती. तिच्यावर मणीपाल-गोवा येथे उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी तिचे दुःखद निधन झाले. 

तीच्या नावे आले पीएम सहायता निधीचे पत्र.. पण पोस्ट कार्यालयानेच केले..

बांदा (सिंधुदूर्ग) : ब्लड कॅन्सर या दुर्धर आजाराने मयत झालेल्या येथील भाग्यश्री सातोस्कर या युवतीच्या नावे येथील विभागीय पोस्ट कार्यालयात पीएम सहायता निधीचे आलेले पत्र नातेवाईकांना कोणतीही कल्पना न देता परस्पर कुडाळ येथे पाठविल्याने संतप्त बांदावासीयांनी सरपंच अक्रम खान व उपसभापती शीतल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली पोस्ट कार्यालयाला घेरावो घालत पोस्टमास्तार रामचंद्र तारी यांना जाब विचारला. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर पोस्टमास्तर तारी यांनी पत्र आणून देण्याचे आश्वासन दिल्याने घेरावो मागे घेण्यात आला.

हेही वाचा- कोकणातील खालू बाजा घुमला दुबईत ...

येथील भाग्यश्री सातोस्कर ही गेली चार महिने ब्लड कॅन्सरने आजारी होती. तिच्यावर मणीपाल-गोवा येथे उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी तिचे दुःखद निधन झाले. तिच्यावरील उपचाराच्या खर्चासाठी समस्त बांदावासीयांनी एकत्र येत ५ लाख रुपये निधी गोळा केला होता. उपसभापती शीतल राऊळ यांनी शासनाच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीतून तिच्या उपचारासाठी रक्कम मंजूर झाली होती. यासंदर्भात माहिती देण्यासाठी भाग्यश्री हिच्या नावे पत्र पाठविण्यात आले होते. हे पत्र बांदा पोस्ट कार्यालयात आले होते. दोन दिवसांपूर्वी भाग्यश्री हिचे निधन झाल्याने पोस्ट कार्यालयाने कोणतीही कल्पना न देता सदरचे पत्र कुडाळ येथे मुख्य कार्यालयात पाठविले.

हेही वाचा- दिव्यांग असूनही तिला शिकायच आहे पण....

पंतप्रधान सहाय्यता निधीतून रक्कम मंजूर मात्र..
   मयत भाग्यश्री हिची बहीण रोशनी सातोस्कर ही पत्र घेण्यासाठी पोस्ट कार्यालयात गेली असता तिला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तिने याची कल्पना उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान यांना दिली. त्यानंतर खान व राऊळ यांनी ग्रामस्थांसाह याठिकाणी येत पोस्टमास्तर तारी यांना जाब विचारत धारेवर धरले. नियमानुसार सदरचे पत्र ७ दिवस कार्यालयात ठेवणे गरजेचे असताना तात्काळ हे पत्र कुडाळ येथे पाठविण्याचे प्रयोजन काय असा सवाल खान यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यालयातील महिला कर्मचारी नीता घोडगे यांनीच उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे रोशनी हिने सांगितल्याने घोडगे यांची तातडीने बदली करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.

हेही वाचा- चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ...

सातोस्कर कुटुंबीय दुःखात असताना...
सातोस्कर कुटुंबीय दुःखात असतानाही पोस्ट कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी माणुसकी सोडून वागणे हे चुकीचे असून जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातील कर्मचारी यांना कोंडून ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. या कार्यालयाबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी असून येथील कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना सौजन्याने सेवा न दिल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. त्यानंतर पोस्टमास्तर तारी यांनी स्वतः कुडाळ येथे जाऊन पत्र आणून देण्याचे आश्वासन दिल्याने घेरावो मागे घेण्यात आला. यावेळी सुनील धामापूरकर, संतोष सावंत, संदीप सातोस्कर, बबन धुरी, रोहिणी सातोस्कर, ओंकार नाडकर्णी, सुदेश सातोस्कर, सुनील राऊळ, सचिन नाटेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.