"माकडहाड डॉट कॉम' व्यवस्थेला आव्हान देते - कवयित्री प्रा. निरजा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

अनेकांना अस्वस्थेत कसे व्यक्त व्हायचे हे कळत नाही. या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणारा "माकडहाड डॉट कॉम' हा कथासंग्रह आहे. वर्तमानात माणसे व्यवस्थेची गुलाम झालेली असताना हा कथासंग्रह वर्तमान काळाचा दस्तावेज बनू पाहतो आहे, असे प्रतिपादन नामवंत कवयित्री प्रा. नीरजा यांनी येथे केले.

चिपळूण - अनेकांना अस्वस्थेत कसे व्यक्त व्हायचे हे कळत नाही. या पार्श्‍वभूमीवर व्यवस्थेला आव्हान देऊ पाहणारा "माकडहाड डॉट कॉम' हा कथासंग्रह आहे. वर्तमानात माणसे व्यवस्थेची गुलाम झालेली असताना हा कथासंग्रह वर्तमान काळाचा दस्तावेज बनू पाहतो आहे, असे प्रतिपादन नामवंत कवयित्री प्रा. नीरजा यांनी येथे केले. 

येथील लोटिस्माच्या वतीने "माकडहाड डॉट कॉम' या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच केले. यावेळी नीरजा म्हणाल्या, शतकाची परंपरा असलेल्या लोटिस्माच्या वतीने हा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. लेखक प्रा. संजय गोनबरे यांनी सामाजिक वास्तवाच्या संदर्भाने कथाची मांडणी केली आहे.

वर्तमानात माणसे व्यवस्थेची गुलाम झालेली आहेत. त्यामुळे लेखक त्यांचा पक्ष घेऊन लिहीत नाहीये. वास्तवात बोलीभाषा मरत चाललेल्या असल्या तरी त्याचा उपयोग या कथासंग्रहामध्ये समर्पकपणे केलेला आढळून येतो. तसाच इसापनीतीमधील मूळ कथाचा उपयोग यामध्ये केलेला आढळतो. या पुस्तकात सुपरिचित प्राणीकथाचे उपहासगर्भ पुनर्कथन, इसापनीतीच्या जुन्या कथाचा अन्वयार्थ असलेल्या कथांचा समावेश आहे. 

डॉ. सुभाष देव, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीता राजे पवार, सह्याद्रीचे प्रमुख शेखर निकम, अरुण इंगावले, रेखा देशपांडे, लेखक प्रा. गोनबरे आदी उपस्थित होते. जय महाराष्ट्र कला पथकाने यांनी गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले. प्रा. अंजली बर्वे यांनी प्रा. नीरजा यांचा सत्कार केला. अरुण इंगवले यांनी या निर्मितीवर सविस्तर भाष्य करीत लेखकाचे कौतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poet Prof Niraja comment on Makadhad Dot com book