मासळी लुटल्याप्रकरणी 16 जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

मालवण (सिंधुदुर्ग) कोलवा-गोवा येथील जुवाव मार्टीन फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या मालकीच्या ओंकार या ट्रॉलरवरील सुमारे 16 मच्छीमारांवर चोरीसह दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील ट्रॉलर, मासळी तसेच एलईडी बल्ब हे साहित्य जप्त केले आहे. सर्व संशयितांवर कारवाई करत सोडून दिले आहे. जप्त मासळीचा लिलाव करून रक्कम गोवा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली. 

याबाबतची माहिती अशी ः गोवा ते सिंधुदुर्गच्या समुद्रात सुमारे 60 ते 65 नॉटिकल मैल अंतरावर मासेमारी करणाऱ्या कोलवा-गोवा येथील जुवाव फर्नांडिस यांच्या ट्रॉलरला सर्जेकोट येथील नारायण आडकर यांच्या ट्रॉलरने घेरल्याची घटना परवा मध्यरात्री घडली. यात फर्नांडिस यांचा ट्रॉलर घेरत ट्रॉलरवरील मासळी, तसेच अन्य साहित्य असा एकूण 9 लाख रुपये किमतीचे साहित्य चोरल्याची घटना घडली. याप्रकरणाची तक्रार फर्नांडिस यांनी गोवा कोस्टलच्या पोलिसांसह, सिंधुदुर्गच्या पोलिसांकडे केली. गोव्यातील फर्नांडिस यांच्या ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबतची माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना दिल्यानंतर काल (ता.29) मालवण पोलिसांच्या गस्ती नौकेने आडकर यांचा मालकीचा ओंकार ट्रॉलर क्रमांक (आयएनडी-एम. एच.- एम. एम.- 3348) हा ट्रॉलर समुद्रात पकडून येथील बंदरात आणला. या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी होती. या ट्रॉलरवर कारवाई करण्याबाबत मत्स्य व्यवसाय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता; मात्र मत्स्यव्यवसाय विभागाकडून रात्री उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झाली नव्हती. 

ट्रॉलरवरील मासळीची लूट केल्याप्रकरणी किशोर सुभाष कांदळगावकर (वय 42), पुंडलिक कमलाकर शेलकर (वय 37 दोघे रा. कोळंब खालचीवाडा), नीलेश रमेश आडकर (वय 28), राहुल दिलीप आडकर (वय19) मयूर हरी खवणेकर (वय 23 तिघे रा. सर्जेकोट पिरावाडी), नारायण ऊर्फ भगवान सहदेव आडकर (वय 49), निहाल राजाराम आडकर (वय 22), तेजस शंकर फोंडबा (वय 23), रजनीकांत संभाजी पाडकर (वय 32), केदार प्रकाश कुडाळकर (वय 25), गोविंद मारुती सावजी (वय-22), हर्षल रवींद्र पराडकर (वय 30 रा. सर्जेकोट मिर्याबांद), जगदीश खंडोबा कांदळगावकर (वय 34), जगन्नाथ अंकुश सावजी (वय-31 सगळे रा. सर्जेकोट मिर्याबांदा), रजनीकांत रामकृष्ण देऊलकर (वय-31 रा. सर्जेकोट), हनुमंत भालचंद्र कवटकर (वय-30 रा. सर्जेकोट जेटी) या सोळा जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या सर्व संशयितांना सोडून देण्यात आले आहे. लॉकडाउननंतर पुढील तपासावेळी सर्व संशयितांना बोलावून घेत चौकशी केली जाणार असल्याचे हार्बर कोस्टल सेक्‍युरिटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी स्पष्ट केले. 

मासळीचा लिलाव 
या गुन्ह्याच्या तपासासाठी आज गोव्यातील हार्बर कोस्टल सेक्‍युरीटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, पोलिस उपनिरीक्षक ऑल्विटो फर्नांडिस, केदार भवर, जयेश तारी यांचे पथक मालवणात दाखल झाले. गुन्ह्यातील ट्रॉलर मालवण पोलिसांनी ताब्यात घेतला होता. मत्स्यव्यवसाय अधिकारी मुरारी भालेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलिस कर्मचारी माही महाडिक यांच्या उपस्थितीत बंदरावर या ट्रॉलरवरील लिलाव झाला. 2 लाख 33 हजार 60 रुपयांना मासळीचा लिलाव झाला. दुपारी उशिरा लिलावाची रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली. शिवाय जप्त ट्रॉलरही पोलिसांच्या ताब्यात दिला, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिरोडकर यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action fishing trawler sarjekot sindhudurg district