esakal | आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

police action weekly market traders kankavli sindhudurg

नगरपंचायत प्रशासनाने काल (ता.5) आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांना सूचना न मिळाल्याने नसल्याने आज कणकवली बाजारपेठ आणि शहरातील सर्व प्रकारची दुकाने नेहमी प्रमाणे सुरू होती. आठवडा बाजारातही शहर आणि दशक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांवर कारवाई

sakal_logo
By
राजेश सरकारे

कणकवली (सिंधुदुर्ग) - आठवडा बाजार बंद ठेवण्याचे निर्देश असतानाही कणकवली शहरात आठवडा बाजार फुल्ल गर्दीने सुरू राहिला. त्यामुळे नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाने सकाळी दहापासून कारवाई करून आठवडा बाजारातील विक्रेत्यांना हटविले. त्यानंतर अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यासाठीही पोलिसांनी कारवाई सुरू केली. यावेळी व्यापारी आणि पोलिसांमध्ये वादाचेही प्रकार घडले. 

नगरपंचायत प्रशासनाने काल (ता.5) आठवडा बाजार बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते; मात्र अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने सुरू अथवा बंद ठेवण्याबाबत व्यापाऱ्यांना सूचना न मिळाल्याने नसल्याने आज कणकवली बाजारपेठ आणि शहरातील सर्व प्रकारची दुकाने नेहमी प्रमाणे सुरू होती. आठवडा बाजारातही शहर आणि दशक्रोशीतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ही बाब लक्षात येताच कणकवलीचे पोलिस उपविभागीय अधिकारी नितीन काटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजहरुद्दीन मुल्ला, उपनिरीक्षक एस एस खंडागळे, किरण मेटे, वाहतूक पोलिस संदेश आबिटकर यांच्यासह नगरपंचायत पथकाने विक्रेत्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र आठवडा बाजारातील दुकाने सुरूच राहिल्याने नगरपंचायत आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली. यात काही विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. तर काहींकडून प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाईनंतर मात्र विक्रेत्यांची धावपळ उडाली आणि दुपारी बारा वाजेपर्यंत आठवडा बाजारातील सर्व विक्रेत्यांना हटविण्यात पोलिस आणि नगरपंचायत यंत्रणेला यश आले. 

दरम्यान अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. मात्र दुकाने सुरूच राहिल्याने पोलिसांनी दुकाने बंद ठेवल्यास कारवाईचा इशारा दिला. यावेळी शहरातील व्यापारी आणि पोलिस अधिकाऱ्यांत वादंगाचे प्रकार घडले. अखेर व्यापारी संघाचे प्रतिनिधी, नगरपंचायत प्रशासन आणि पोलिस अधिकारी यांच्या संयुक्‍त बैठकीनंतर अत्यावश्‍यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली. यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्याचाही निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला होता. 

कणकवलीत सर्व दुकाने सुरू 
जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्‍यक वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले असले तरी या परिपत्रकामध्ये सुस्पष्टता नसल्याने कणकवली शहरातील सर्व प्रकारची दुकाने आज सुरू ठेवण्यात आली होती. आज सायंकाळी व्यापारी संघाचे प्रतिनिधी पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. या भेटी नंतर उद्यापासून दुकाने सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे व्यापारी संघाकडून स्पष्ट करण्यात आले.  

 संपादन - राहुल पाटील

loading image