अशी नाकाबंदी गुहागरकर पुन्हा अनुभवणार : लॉकडाऊनसाठी गुहागर तालुक्‍यात होणार कठोर कार्यवाही 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 1 जुलै पासून 8 जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे.

गुहागर (रत्नागिरी ) : जिल्ह्यात पुन्हा सुरु होणाऱ्या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये कडक बंदोबस्त व नाकाबंदी करण्यात येणार आहे. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस निरिक्षक अरविंद बोडके यांनी पत्रकारांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे मास्क वापरुन आणि सामाजिक अंतराचे भान ठेवण्याच्या अटीवर अत्यावश्‍यक सेवा सुरु रहातील, असे तहसीलदार धोत्रे यांनी सांगितले. 

कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी 1 जुलै पासून 8 जुलैपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच्या कार्यवाहीविषयी बोलताना गुहागर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद बोडके म्हणाले की, मार्च महिन्यात लॉकडाऊनला सुरवात झाली, तेव्हा असलेल्या बंदोबस्ताप्रमाणेच पुन्हा बंदोबस्त होणार आहे. मात्र, यावेळी पोलीस अधिक कठोर भूमिकेत दिसतील. गुहागर तालुक्‍याच्या सीमेवर बोऱ्याफाटा, आबलोली, रानवी, शृंगारतळीतील वेळंब फाटा, मोडकाआगर नाका अशी ठिकाणे निश्‍चित केली आहेत. या ठिकाणी 24 तास पोलीसांचा पहारा असेल. विनाकारण फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलिसांविरोधात तक्रारी आल्या तरी लॉकडाऊनचा कोणताही कायदा मोडून दिला जाणार नाही. 

हेहि वाचा :ब्रेकिंग - रत्नागिरीत आणखी 19 जणांना कोरोनाची लागण
 

केवळ 10 टक्के कर्मचारी.. 

तहसीलदार लता धोत्रे म्हणाल्या की, तालुक्‍यातील कार्यालये आणि अत्यावश्‍यक सेवा वगळून अन्य सर्व आस्थापना बंद राहतील. शासकीय, निमशासकीय आणि अन्य कार्यालयांमध्ये केवळ 10 टक्के कर्मचारी उपस्थित रहातील. अत्यावश्‍यक सेवांचे ठिकाणी मास्क बांधणे गरजेचे आहे. तसेच सामाजिक अंतराचे भानही राखले गेले पाहिजे. हे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Inspector Arvind Bodke lockdown information for reporter