यंदा नवरात्रोत्सवात दांडिया, गरबा नाही!

विनोद दळवी
Sunday, 18 October 2020

पोलिस अधीक्षक दाभाडे म्हणाले, ""यंदा 17 ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये.

ओरोस (सिंधुदुर्ग) - यंदाच्या नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे नवरात्रीत गरबा, दांडिया आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केले. 

सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवरात्रोत्सव मंडळांचे अध्यक्ष व सदस्यांच्या बैठकीत दाभाडे बोलत होते. यावेळी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलिस निरीक्षक एस. पी. पवार, वाहतूक नियत्रंण शाखेचे प्रमुख व्हटकर, नवरात्रोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

पोलिस अधीक्षक दाभाडे म्हणाले, ""यंदा 17 ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत जिल्ह्यामध्ये नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. त्या अनुषंगाने गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. त्या ऐवजी "माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत आरोग्य शिबिरे, आरोग्य विषयक जाहिराती प्रदर्शित कराव्यात. सार्वजनिक नवरत्रोत्सव मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे.'' 

यावेळी पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी नवरात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही. याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देवून जिल्हावासीयांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. 

मंडळांना सूचना 
दाभाडे म्हणाले, की ""सार्वजनिक मंडळानी ध्वनी प्रदूषण नियम व तरतुदीचे पालन करावे. देवीचे दर्शन ऑनलाईन होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. उत्सवादरम्यान कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळ पदाधिकाऱ्यांनीही सामाजिक अंतर पाळावे. भाविकांनाही सामाजिक अंतर, मास्कबाबत सूचित करावे. भाविकांसाठी सॅनिटायझर व साबण, पाणी आदींची व्यवस्था करावी.'' 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police instructions in Sindhudurg regarding Navratri festival