मेर्वी येथे पोलिस दूरक्षेत्र कार्यान्वित 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

गृहमंत्रालयाने दोन कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर ही इमारत उभी राहिली. या पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या 22 गावांचा कारभार विभागला जावा आणि अतिरिक्त भार कमी होण्यासाठी पूर्णगड पोलिस दूरक्षेत्र निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते.

पावस (रत्नागिरी) - मेर्वी येथे पोलिस महासंचालक यांच्या वार्षिक योजनेतून बांधण्यात आलेल्या इमारतीतून पूर्णगड पोलिस दूरक्षेत्राचे कामकाज सुरू झाले आहे. या दूरक्षेत्रातून आठ गावांचा कारभार पाहिला जाणार आहे. 

पावस पोलिस दूरक्षेत्रांतर्गत परिसरातील 22 गावांचा कारभार पूर्वी चालत असे. त्यानंतर सागरी सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याची नोव्हेंबर 2013 मध्ये स्थापना करण्यात आली. या सागरी पोलिस ठाण्यामध्ये 22 गावांचा समावेश करण्यात आला. सुरवातीच्या काळात पूर्णगड सागरी पोलिस ठाणे चार वर्षे भाड्याच्या जागेत होते. त्यानंतर पावस येथे शासकीय जागेत स्व मालकीची इमारत बांधण्यात आली.

गृहमंत्रालयाने दोन कोटी 99 लाख रुपयांचा निधी मंजूर केल्यानंतर ही इमारत उभी राहिली. या पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या 22 गावांचा कारभार विभागला जावा आणि अतिरिक्त भार कमी होण्यासाठी पूर्णगड पोलिस दूरक्षेत्र निर्मितीसाठी प्रयत्न सुरू होते. सागरी मार्गावरील मेर्वी येथे शासकीय जागा उपलब्ध झाल्यामुळे त्या ठिकाणी दूरक्षेत्र बांधण्यासाठी पोलिस महासंचालक यांच्या वार्षिक योजनेतून 39 लाख रुपये मंजूर करण्यात आले. त्याचे बांधकाम सागरी पोलिस ठाण्यापाठोपाठ सुरू झाले होते. या पूर्णगड पोलिस दूरक्षेत्राचे नुकतेच उद्‌घाटन झाले.

नागरिकांना त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार येथील पोलिस निरीक्षक सुरेश गावित यांच्या मार्गदर्शनाखाली गावखडी, पूर्णगड, दाभिळआंबेरे, शिवारआंबेरे, गावडेआंबेरे, डोर्ले, मेर्वी, जांभूळआड या आठ गावांसाठी पोलिस दूरक्षेत्र सुरू केले आहे. त्यामुळे या परिसरातील लोकांना वारंवार पावसला येण्याची गरज भासणार नाही.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Outpost Station Starts At Mervi Ratnagiri Marathi News

Tags
टॉपिकस
Topic Tags: