कर्तव्यावर असताना ही जपली सामाजिक बांधिलकी ; 'त्या' पोलिसाच्या कार्याचे कौतुक

निलेश मोरजकर
Wednesday, 12 August 2020

पोलीस कर्मचारी कोरोना महामारीच्या काळात आपली सेवा बजावत आहेत.

बांदा (सिंधुदुर्ग) : 'सदरक्षणाय, खलनिग्रहणाय' या ब्रिदानुसार पोलीस कर्मचारी कोरोना महामारीच्या काळात आपली सेवा बजावत आहेत. जनतेचा रक्षक असलेला पोलीस हा प्रसंगी जीवनदाताही बनू शकतो हे दाखवून दिले आहे. येथे आयोजित रक्तदान शिबिरात वाघाटे यांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी तपासणी नाक्यावर 'ऑन ड्युटी' असतानाही रक्तदान करून एक वेगळा आदर्श समाजासमोर निर्माण केला आहे.

येथील कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून बांदा रक्तदाता ग्रुप आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध पक्षांचे राजकीय पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी रक्तदान करून आपली समाजाप्रती असलेली जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा- मिर्‍यावासीय  भडकले ; आता घेतला हा निर्णय -

पोलीसी खाक्यामुळे किंवा कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे पोलिसांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे नेहमीच त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण कित्येक वेळा पोलिसांनी सामाजिक स्तरावर उल्लेखनीय काम करून त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडविले आहे.कोरोनाच्या महामारीत सर्वजण ग्रासले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे कोणीही हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान करण्यास अनुत्सुक असतात. त्यामुळे सामाजिक जाणिवेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा- तुम्हाला माहित आहे का? या गावाला तूळशी वृंदावनाचे गाव का म्हणतात?

तुषार वाघाटे हे बांदा पोलीस ठाण्यात कार्यरत असून ते नेहमीच वर्दळ असलेल्या महाराष्ट्र-गोवा सीमेवर तपासणी नाक्यावर कार्यरत आहेत. येथे आयोजित रक्तदान शिबिराची माहिती मिळाल्याने त्यांनी आपल्या व्यस्त सेवेतूनही रक्तदान करण्याचा निर्णय घेतला. रक्तदान शिबिरात माणुसकी आणि सामाजिक जाणिवेतून ऑन ड्युटी असूनही त्यांनी शेवटच्या क्षणी येत रक्तदान करून जीवनदानाच्या या कार्यात सहभाग घेतला. या रक्तदात्याची बांदा शहरात चर्चा होत असून पोलीस दलातील हा युवक लोकांच्या प्रशंसेस पात्र ठरत आहे.

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police tushar waghate Blood donation at Patradevi check post on Maharashtra Goa border despite being on duty