उंचीवर गेलेल्या चार बड्या नेत्यांची ग्रामपंचायतीसाठी प्रतिष्ठा पणाला

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

चौघा नेत्यांनी आपली प्रतिष्ठा ग्रामपंचायतीत पणाला लावली आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : उंचीवर गेलेले राजकारणी अथवा पदाधिकारी अधिक उंचीवर जाण्याचा प्रयत्न करतात; मात्र चिपळुणात तर उंचीवर गेलेले पुढारी पुन्हा गावात उतरले आहेत. तेही ग्रामपंचायत निवडणूक मैदानात!, हेच या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. 

जिल्ह्याच्या आणि तालुक्‍याच्या राजकारणात विविध पक्षांचे नेतृत्व करणारे पदाधिकारी आता आपापल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. तालुक्‍यात नेहमी चर्चेत असलेल्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांना गावातील सर्वसामान्य उमेदवारांनी थंडीत घाम फोडला आहे. यामधील चौघा नेत्यांनी आपली प्रतिष्ठा ग्रामपंचायतीत पणाला लावली आहे.
राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के हे चिवेली ग्रामपंचायतीत विजयासाठी लढत आहेत.

हेही वाचा - कोकणच्या इतिहासाच्या साक्षीदाराचा नवा साज पर्यटकांना लुभावणारा; दररोज शंभर पर्यटकांची भेट -

चिवेलीत पंचायत समिती सदस्य नंदकिशोर शिर्के यांचे वर्चस्व असल्याने युवक जिल्हाध्यक्षांना लढत सोपी आहे. युवकचे माजी तालुकाध्यक्ष मयूर खेतले हे मुंढे येथून ग्रामपंचायत निवडणूक लढवीत आहेत. मयूर खेतले हे तालुक्‍यातील युवकांचे वजनदार नेतृत्व आहे. त्यांचे वजन या निवडणुकीत पणाला लागले आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष नलावडे यांना ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून दिले. गावाने त्याच्यांवर गावाच्या विकासाचा विश्वास व्यक्त केला आहे.

परिणामी त्यांना संघर्ष करावा लागला नाही. मात्र, युवक राज्य सरचिटणीस डॉ. चाळके, माजी सभापती चव्हाण, युवक जिल्हाध्यक्ष शिर्के, माजी तालुकाध्यक्ष खेतले यांनाच आपल्याच गावात विजयासाठी धडपड करावी लागत आहे. नेतृत्व करणाऱ्यांची ही धडपड मात्र तालुक्‍यात चर्चेचा विषय बनली आहे.

..हा प्रकार साऱ्यांना कोड्यात टाकणारा

चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शिवसेनेचे आक्रमक शिवसैनिक जितेंद्र उर्फ पप्या चव्हाण हे रामपूरमधून निवडणूक लढवत आहेत. चव्हाण यांच्या सौभाग्यवती या पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांनी निवडणूक मैदानात उडी घेतल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात असून हा प्रकार साऱ्यांना कोड्यात टाकणारा ठरला आहे.

हेही वाचा - चाळमालकाने खोलीचे दार मागच्या बाजूने तोडले अन्... 

राज्याच्या युवक नेत्याचा संघर्ष चर्चेत

तालुक्‍यात शिवसेना, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून उतरून आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. ज्या ठिकाणी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना संधी द्यायची असते, त्या ठिकाणीच हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवून प्रतिष्ठा पणाला लावली आहे. राष्ट्रवादी युवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा राष्ट्रवादीचे नेते डॉ. राकेश चाळके हे सती चिंचघरी येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. ते एका सर्वसामान्य उमेदवारासमोर विजयासाठी संघर्ष करीत आहेत. राज्याच्या युवक नेत्याचा संघर्ष चर्चेचा विषय बनला आहे. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political leaders also run grampanyat election with young candidate in chiplun ratnagiri