esakal | अतिक्रमणांना राजकीय पाठबळ ; प्रशासनाला कात्रीत पकडण्याची खेळी 
sakal

बोलून बातमी शोधा

Political support to encroachments

काहींनी रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्री सुरू केली होती. दिवाळीच्या सणात सगळ्यांना व्यवसाय करण्याची संधी पालिकेने दिली

अतिक्रमणांना राजकीय पाठबळ ; प्रशासनाला कात्रीत पकडण्याची खेळी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - प्रशासनाने अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरवात केल्यानंतर राजकीय नेत्यांकडून खोकेधारक, हातगाडी चालकांना पाठबळ दिले जाते. त्यामुळे शहरात अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत व्यवसाय फोफावत आहेत. अतिक्रमणांना राजकीय नेते आणि नगरसेवकांचे उघड पाठबळ मिळत आहे. पालिकेने कारवाईला सुरवात केल्यावर प्रशासनाला कात्रीत पकडण्यासाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी गुंता वाढत चालला आहे.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील रस्त्यांवर शेकडो व्यवसायिक आणि फेरीवाल्यांनी आपला व्यवसाय मांडला होता. शहरातील दाटीवाटीच्या रस्त्यांवर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या लागल्या होत्या. काहींनी रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्री सुरू केली होती. दिवाळीच्या सणात सगळ्यांना व्यवसाय करण्याची संधी पालिकेने दिली. रमेश खळे यांनी शिवनदीलगत आणि महावितरणच्या 33 केव्ही लाइनच्याखाली पत्र्याची पक्की शेड उभी केल्यानंतर त्यावर पालिकेने कारवाईला सुरवात केली. आपल्या बांधकामाला अभय मिळावे, म्हणून खळे व त्यांच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशीच्या कारवाईत भोगाळे येथील एका व्यापाऱ्याने जेसीबीच्या खाली झोपून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले आणि त्यांचे अनधिकृत बांधकाम तोडले. त्याच दरम्यान अतिक्रमण मोहीम थांबविण्यासाठी राजकीय नेते थेट पालिकेवर धडकले. विद्यमान नगरसेवकांनीही प्रशासनाच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. पालिका निवडणूक जवळ आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी काहींनी प्रशासनावरच ताशेरे आढले. त्यामुळे शहरातील अनधिकृत बांधकामाला अभय मिळत आहे. मोकळी जागा दिसली की तेथे व्यवसाय सुरू केला जात आहे. 

हे पण वाचासाखरेभोवतीच राजकारण; आता सामना रंगणार दोन साखर सम्राटांमध्ये

फेरीवाल्यांनी वर्दळीच्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. एकेरी मार्गावरही अतिक्रमण वाढले आहे. दिवाळीमध्ये कारवाई केली नाही. मात्र, रस्त्यावरचे अतिक्रमण असेच राहिले तर नागरिकांना चालणेही कठीण होईल. आम्ही कारवाई सुरू केल्यास फेरीवाले, व्यावसायिक आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्या वेळी काही राजकीय पक्षांचे नेते त्यांची बाजू घेतात. कारवाईत मध्यस्थी करणाऱ्यांना बाजूला केल्यास मोहिमेला पाठबळ मिळेल. 
-डॉ. वैभव विधाते, मुख्याधिकारी चिपळूण पालिका 

शहरात आजी-माजी नगरसेवकांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या हातगाड्या आहेत. पालिकेने कारवाई केल्यानंतर जप्त केलेले साहित्य सोडविण्यापर्यंतची यंत्रणा कार्यरत होते. पोलिस व पालिकेतील अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राजकीय नेते, फेरीवाले आणि व्यावसायिकांच्या पाठीमागे आहेत. त्यामुळे शहरात फेरीवाल्यांना पाठबळ मिळत आहे. 
- प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी चिपळूण 

संपादन - धनाजी सुर्वे