मंडणगड नगरपंचायतीच्या विकासकाम फलकावरून राजकारण ढवळले

सचिन माळी
Wednesday, 30 September 2020

कार्पण सोहळा नाम फलकावरती आदेश मर्चंडे हे नाव विषय समिती सभापतींच्या रांगेत नामोल्लेख न करता नगरसेवकांच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले. 

मंडणगड - मंडणगड नगरपंचायतीने नुकत्याच पूर्ण केलेल्या विकासकामाच्या नामफलकात नगरपंचायतीचे मागासवर्गीय समाजकल्याण सभापती या पदाचा विषय समिती सभापतींच्या रांगेत उल्लेख न केल्याने समितीचे सभापती आदेश मर्चंडे यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकरणावर योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यामुळे निवडणूक उंबरठ्यावर आलेल्या मंडणगड नगरपंचायतीचे राजकीय वातावरण ढवळले असून विविध चर्चांना उधाण आले आहे.

नगरपंचायतीत सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील धुसफूस यामुळे उघड झाली आहे.
 या विषयासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रार अर्जातील माहीतीनुसार, मंडणगड नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा 11 जून 2019 रोजी झाली. या सभेत ठराव क्रमांक 55 नुसार नवीन नगरपंचायत योजनेअंर्तगत प्राप्त झालेल्या निधीतून 31 लाख 28 हजार 900 रुपये इतका निधी खर्च करुन गांधी चौकी येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे हे काम करण्यात आले. या कामांचा लोकार्पण सोहळा 12 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आला. या सोहळ्याच्या नामफलकावर विषय समिती सभापती असा नाम उल्लेख करण्यात आला आहे. त्याखाली नगरसेवकांचा नाम उल्लेख करण्यात आला आहे. परंतू लोकार्पण सोहळा नाम फलकावरती आदेश मर्चंडे हे नाव विषय समिती सभापतींच्या रांगेत नामोल्लेख न करता नगरसेवकांच्या यादीमध्ये समाविष्ठ करण्यात आले. 

आदेश मर्चंडे हे नगरपंचायतीच्या मागासवर्गीय समाजकल्याण समितीचे सभापती असतानाही विषय समित्यांचे सभापतींच्या यादीमध्ये त्यांचे नाव लिहण्याचे जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याची तक्रार आदेश मर्चंडे यांनी आपल्या अर्जात केली आहे. तसेच स्मशानभूमीचे कामाचे लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रमाबाबत समाज कल्याण सभापती या नात्याने आदेश मर्चंडे यांनी कोणतीही कल्पना तसेच नियोजन बैठकीत सामावून घेतले गेले नसल्याचेही त्यांनी  सांगीतले आहे.

हे पण वाचामाजी आमदारांचा भाजपमधून पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश

 मागासवर्गीय समाजकल्याण समिती ही मागासवर्गीय समाज घटकांच्या सार्वजनिक विकासासाठी काम करीत असल्याने आदेश मर्चंडे यांच्या नावाचा उल्लेख सभापतीची नावे असलेल्या यादीमध्ये समाविष्ठ करण्याची आवश्यकता निवेदनात व्यक्त केली आहे.

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics from the development work board of Mandangad Nagar Panchayat