शिक्षक संघटनेत फोडाफोडीचे राजकारण; घडामोडींचा केंद्रबिंदू लांजा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

संभाजी पाटील गटाने शिवाजी पाटलांच्या गटांतील वजनदार पदाधिकारी आपल्या गोटात वळविण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पतपेढीच्या चेअरमनपदावरून सुरू झालेली ही लढाई आता अधिक तीव्र झाली आहे.

लांजा ( रत्नागिरी ) - दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिक्षक संघटनेतील फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या घडामोडींचे लांजा हे केंद्रबिंदू झाले आहे. दोन शिक्षकसंघात तर पुरोगामी आणि शिक्षक समिती यात शीतयुद्ध रंगले आहे. 

संभाजी पाटील गटाने शिवाजी पाटलांच्या गटांतील वजनदार पदाधिकारी आपल्या गोटात वळविण्यात यश मिळवले आहे. जिल्हा पतपेढीच्या चेअरमनपदावरून सुरू झालेली ही लढाई आता अधिक तीव्र झाली आहे. दरम्यान, शिक्षक समितीतील काही नाराज कार्यकर्ते पुरोगामी समितीकडे आकृष्ट झाले आहेत.

नुकतीच लांजात पुरोगामीची चिंतन बैठक पार पडली होती. या बैठकीदरम्यान काही चर्चेतील चेहरे यांनी भेट घेतली होती. जिल्हा संघात दोन गट परस्पर विरोधी कार्यरत आहेत. मध्यतरी चिपळूणचे संतोष कदम यांच्यावर शिवाजी गटाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली. चार संघटना मिळून जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीत युती आहे. चेअरमनपद ठराविक कालावधीवर वाटुन घेण्यात आले आहे. या वेळी चेअरमनपद संघाच्या वाट्याला आले आहे.

या निवडीदरम्यान मंडणगड, गुहागर आणि रत्नागिरी येथील तीन संघ संचालक इच्छुक होते. मंडणगडला चेअरमन देण्यासाठी उत्तर भाग राजी होता. परंतु दिलीप देवळेकर यांचे पारडे ऐनवेळी जड झाले. चिपळूण ओमली येथील संतोष कदम यांना जिल्हाध्यक्ष जबाबदारी देऊन अंतर्गत मतभेद दूर करण्यात आले. मात्र रत्नागिरीतील काहीजण नाराज होते. त्यातील एकजण चार दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या संभाजी पाटील गटाकडे प्रवेशकर्ते झाले. दरम्यान, ज्यांनी संघटनेचा स्वार्थासाठी उपयोग केला असे दुसरीकडे गेले तरी काही फरक पडणार नसल्याचा दावा शिवाजी पाटील गटाने केला आहे. 

बैठकीत इतर संघटनांचे पदाधिकारी 
लांजात शिक्षक पतपेढी निवडणूकीपासून शह काटशह सुरू आहेत. संतोष पावणे यांचा पराभव झाल्यानंतरही जिल्हा कार्यकारिणीवर वर्णी लागल्यावरून समितीच्या काहीजणांचा आक्षेप आहे. लांजात समितीने शिक्षकांचे विविध प्रश्न हाताळून पुन्हा उभारणी केली आहे. वाढता प्रभाव लक्षात घेऊन पुरोगामी समिती सक्रिय झाली आहे. त्यातील नाराजाना आपल्या गोटात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. पुरोगामीची एक बैठक झाली. या बैठकीत इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics Fragmentation In Teachers Union Lanja Is Politcal Center