esakal | आरोसबागमधला जीवघेणा प्रवास थांबणार 

बोलून बातमी शोधा

pool work orosbag konkan sindhudurg

आरोसबाग येथे नदीपात्रात पूल होण्यासाठी कित्येक आंदोलने, उपोषणे झाली; मात्र प्रत्येकवेळी आश्‍वासनांची खैरात करत ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. शेर्ले गावची आरोसबागवाडी ही 800 ते 900 लोकवस्तीची आहे. ही वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे.

आरोसबागमधला जीवघेणा प्रवास थांबणार 
sakal_logo
By
निलेश मोरजकर

बांदा (सिंधुदुर्ग) - बांदा-शेर्ले दरम्यान तेरेखोल नदीपात्रातील आरोसबाग पुलाचे 95 टक्के काम पूर्णत्वास आल्याने यावर्षी पावसाळ्यात आरोसबागवासीयांचा होडीतील जीवघेणा प्रवास आता संपणार आहे. पुलाचे अंतीम टप्प्यातील काम सुरू असून मेच्या अखेरपर्यंत हा पूल वाहतुकीस खुला होणार आहे. गेल्या अनेक वर्षांची आरोसबागवासीयांची मागणी पूर्ण झाल्याने या वाडीतील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. 

आरोसबाग येथे नदीपात्रात पूल होण्यासाठी कित्येक आंदोलने, उपोषणे झाली; मात्र प्रत्येकवेळी आश्‍वासनांची खैरात करत ग्रामस्थांच्या मागण्यांना केराची टोपली दाखविण्यात आली. शेर्ले गावची आरोसबागवाडी ही 800 ते 900 लोकवस्तीची आहे. ही वाडी पूर्णपणे बांदा शहरावर अवलंबून आहे. शिक्षण, आरोग्य, बाजार यासाठी येथील ग्रामस्थांना रोज बांदा शहरात यावे लागते. दिवस असो की रात्र, उन्हाळा असो की पावसाळा आरोसबागवासीयांना दळणवळणासाठी होडी हाच एकमेव आधार होता. नदीच्या पल्याड येण्यासाठी गेली अनेक वर्षे होडीतील हा जीवघेणा प्रवास सुरू होता. याठिकाणी पूल व्हावा यासाठी 1987 सालापासून खऱ्या अर्थाने प्रयत्न सुरू झाले. त्यावेळी असंख्य अर्ज, निवेदने शासन दरबारी देण्यात आली. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कित्येक आंदोलने देखील झाली; मात्र मागणीला यश मिळत नव्हते. 

उन्हाळ्यात नदीपात्रात स्थानिक लोक श्रमदानातून लाकडी साकव बांधतात. 1995 मध्ये प्रथमच नदीपात्रात बांधलेल्या साकवाचे उद्‌घाटन देवगडचे दिवंगत आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आप्पासाहेब यांनी याठिकाणी पूल होण्यासाठी शेवटच्या श्‍वासापर्यंत लढा देणार असल्याचे अभिवचन आरोसबागवासीयांना त्यांनी दिले. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा सुरू झाला. युती शासन काळात या पुलाच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. 

तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 23 मे 1999 ला या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या पुलाचा आराखडा देखील तयार झाला. युती शासन गेल्यानंतर आघाडी शासनाच्या काळात या पुलाचा प्रश्‍न रखडला. नदीपात्रात एक किलोमीटर अंतरात चार पुलांना मंजुरी मिळत नसल्याचा मापदंड शासनाने पुढे केल्याने या पुलाचे भवितव्य अधांतरी राहिले; मात्र आरोसबाग ग्रामस्थांनी जिद्द सोडली नव्हती. या पुलाच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. जुलै 2014 मध्ये आरोसबाग ग्रामस्थांनी तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, मंदार कल्याणकर, शीतल राऊळ, श्‍यामकांत काणेकर यांच्या माध्यमातून केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची मुंबई येथे भेट घेऊन पुलाच्या कामास तत्काळ मंजुरी देण्याची विनंती केली.

त्यावेळी राज्य शासनाकडे निधीची उपलब्धता नसल्याने मंत्री गडकरी यांनी हे काम नाबार्डमधून मंजूर करून घेण्याचे आश्‍वासन दिले. आश्‍वासनाची पूर्तता करत या पुलासाठी नाबार्ड मधून निधी मंजूर करण्यात आला. तत्काळ निविदा प्रक्रिया पूर्ण करत पुलाच्या प्रत्यक्ष कामास दोन वर्षांपूर्वी प्रारंभ करण्यात आला. कोरोना संकट काळात पुलाचे काम थांबले होते; मात्र यावर्षी पुलाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. पुलाचे अंतिम टप्प्यातील काम शिल्लक असून महिनाभरात प्रत्यक्ष वाहतुकीला पूल खुला होणार आहे. 

होडी चालविणेही जिकरीचे 
गेली अनेक वर्षे आरोसबाग ग्रामस्थ पुलाच्या प्रतीक्षेत होते. पूल प्रत्यक्षात साकारल्याने ग्रामस्थांचे पुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आरोसबाग ग्रामस्थांची शेती व बागायती ही नदी पलीकडे आहे. ग्रामस्थांना होडीतून प्रवास करावा लागायचा. नदीपात्रात गोव्याच्या हद्दीत अलीकडे वाळू उपसा होत असल्याने पात्र खोल झाले आहे. त्यामुळे प्रवाहही वेगवान आहे. अशा स्थितीत होडी चालविणे हे जिकरीचे काम होते. 

22 वर्षांनी स्वप्न झाले साकार 
तब्बल 22 वर्षांनी पूल पूर्णत्वास येत असल्याने स्थानिकांचे हाल थांबणार आहेत. आरोसबागवासीय दरवर्षी जानेवारी महिन्यात तेरेखोल नदीपात्रावर श्रमदानाने लाकडी साकव बांधतात. उन्हाळ्यात चार महिने या साकवावरून ग्रामस्थ प्रवास करतात; मात्र 8 महिने नदीपात्रातून ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन होडीतूनच प्रवास करावा लागत होता. आता हा जीवघेणा प्रवास यावर्षीपासून थांबणार आहे. 

असे आहे पूल 
पुलाला 50 मीटरचे 3 गाळे आहेत. पुलाची एकूण लांबी 150 मीटर असून रुंदी 22 फूट आहे. पुलाचा सर्वाधिक उंची असून पावसाळ्यात पुराच्या पाण्यात पूल बुडण्याची शक्‍यता फार कमी आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलामुळे आरोसबाग बरोबरच कास, मडुरा गावे ही बांदा शहराजवळ आली आहेत. 

आरोसबाग पूल निर्मितीचे खरे श्रेय हे दिवंगत आमदार आप्पासाहेब गोगटे यांचे आहे. त्यांनी प्रशासकीय पातळीवर केलेल्या पाठपुराव्यामुळेच आरोसबागवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी या पुलाला आप्पासाहेब गोगटे यांचे नाव देण्याची मागणी शासन दरबारी करू. 
- संजय चांदेकर, ग्रामस्थ, आरोसबाग 

संपादन - राहुल पाटील