देवरूख नगरपंचायतीत  भाजप-शिवसेनेमधील वाद पेटण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

देवरूख नगरपंचायतीची दुसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2018 मध्ये झाली. या वेळी थेट नगराध्यक्षपदासह सर्वाधिक संख्याबळ पटकावत भाजपने नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला.

देवरूख ( रत्नागिरी) - विषय समिती सभापती पदावरून सुरू झालेला भाजप-शिवसेनेमधील वाद आगामी काळात पेटण्याची शक्‍यता आहे. नगरपंचायत निवडणुकीला अजून दोन वर्षे असल्याने याचाच फायदा घेत दोन्ही पक्ष आपापल्या पद्धतीने राजकीय धुरळा उडवण्याच्या तयारीत आहे. राजकीय रणनीतीत पहिला डाव भाजपला गेला आहे. 

देवरूख नगरपंचायतीची दुसरी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2018 मध्ये झाली. या वेळी थेट नगराध्यक्षपदासह सर्वाधिक संख्याबळ पटकावत भाजपने नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला. विशेष म्हणजे या निवडणुकीत आरपीआय आणि मनसेने भाजपला साथ दिली होती. शिवसेना स्वतंत्र लढली तर आघाडी एकत्र येऊन लढली होती. त्यानंतर राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना आणि भाजपचा असे स्वतंत्र गट नोंदवण्यात आले. 
आता भाजपच्या कारभाराला अडीच वर्षे होऊन गेली आहेत.

संख्याबळ जास्त असल्याने आत्तापर्यंत झालेल्या विषय समित्यांमध्ये भाजपचेच वर्चस्व होते. यातून राजकीय सौहार्द राखत भाजपने राष्ट्रवादीलाही संधी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झालेल्या विषय समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेने वेगळी चाल खेळली. आपला गट विसर्जित करून ते आघाडीच्या गटात सहभागी झाले.

त्या आधीच मनसे त्या गटात होती मात्र सेना या गटात येत असल्याचे पाहून मनसेने यातून बाहेर पडणे पसंत केले. यात संख्याबळाचा घोळ झाला. यातून आता शिवसेना-भाजपमध्ये अंतर्गत युद्ध सुरू झाले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सोशल मीडियावर याचे पेव फुटले आहे. यामुळे हा संघर्ष आगामी काळात वाढत जाण्याचीच शक्‍यता अधिक आहे. नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला अजून दोन वर्षे शिल्लक असली तरी शिल्लक कालावधीत या संघर्षाचा फायदा घेत दोन्ही पक्ष आपापल्यापरीने राजकीय धुरळा उडवण्याच्या तयारीत आहेत. 

आघाडी तोंडावर पडली 
सभापतिपदाच्या निवडणुकीत चिठ्ठीचा कौल घ्यावा लागला; मात्र इथे नशिब भाजपच्या बाजूने फिरले आणि आघाडीसह शिवसेना तोंडावर आपटली. देवरूखात भाजपला शह देण्यासाठी सलग दोन दिवस रत्नागिरीतून हालचाली सुरू होत्या. यासाठी अगदी अपक्ष नगरसेवक फोडण्यापर्यंत मजल गेली; मात्र शेवटी भाजपचा एक्‍का सरस ठरला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility Of BJP Shiv Sena Dispute In Devrukh Nagar Panchayat