वेळासला धरण असूनही `या` कारणाने पाणी टंचाईची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किनाऱ्यावर काढून टाकण्यात आलेला गाळ पावसात पुन्हा पात्रात जाऊन अडकल्याने पाण्यात गाळ की गाळात पाणी अशा स्थिती आहे.

मंडणगड ( रत्नागिरी) - तालुक्‍यातील पूर्णत्वास गेलेले पहिले व्याघ्रेश्वर धरण गेल्या तीन चार वर्षांपासून विविध कारणांनी चर्चेत आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किनाऱ्यावर काढून टाकण्यात आलेला गाळ पावसात पुन्हा पात्रात जाऊन अडकल्याने पाण्यात गाळ की गाळात पाणी अशा स्थिती आहे. 

हे धरण यंदा विविध कारणांनी चर्चेत असून धरणाला लागलेली गळती व गाळामुळे यंदा धरणात पाणीसाठा असताना या धरणाच्या प्रभावातील वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर ही तीन गावे पाण्याअभावी अडचणीत सापडल्याची नागरिकांची तक्रार आहे. तीन ग्रामपंचायती या धरणाच्या प्रभावक्षेत्रात येतात. येथून वेळास गावासह बाणकोट व वाल्मिकीनगर या गावांनाही पाणीपुरवठा होतो. 

यंदा बाणकोट व वाल्मिकीनगर या गावांना विविध कारणांनी पाणीटंचाईचा मेच्या उत्तरार्धात सामना करावा लागत असल्याची नागरिकांची तक्रार असून या निमित्ताने पुन्हा एकदा गाळ काढणे व गळती थांबवणे ही मागणी पुढे येत आहे. 1976 साली कमी खर्चात व अतिशय कल्पकतेने कोकणाची गरज लक्षात घेऊन हे छोटेसे बंधारावजा धरण पूर्णत्वास गेले हे खरेतर तालुक्‍याचे भाग्यच. कारण चिंचाळी, भोळवली, पंदेरी, तुळशी, तिडे येथील धरण प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेले नाहीत त्यामुळे सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागलेला नाही.

अनेक प्रकल्प तीन ते चार दशकापूर्वीचे आहेत. असे असताना वेळास येथील धरणाने अनेक वर्षे तीन गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र यंदा पाणीटंचाईच्या हंगामात धरणात पाणीसाठा असताना मधल्या यंत्रणेत दोष असल्याने बाणकोट व वाल्मिकीनगर येथे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. या दोन गावांना दुसरे समर्थ पर्याय उपलब्ध नसल्याने धरणातील गळतीचा दोष व गाळाची समस्या मार्गी लावण्याची आवश्‍यकता आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibility Of Water Scarcity Due To Deposition Of Mud In Wagreshwar Dam