कणकवलीतील पोस्ट स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर 

राजेश सरकारे
Sunday, 25 October 2020

पोस्ट कार्यालयाचे तातडीने स्थलांतर करा, अशी मागणी इमारत मालकांनी केली. तसेच गेली 70 वर्षे प्रति महिना केवळ 70 रूपये एवढेच भाडे पोस्ट खाते देत असल्याचा मुद्दाही इमारत मालकांनी मांडला. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - मोडकळीस आलेल्या पोस्ट कार्यालय इमारतीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला. नगराध्यक्ष दालनात याअनुषंगाने इमारत मालक आणि पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांत बैठक झाली. यात पोस्ट कार्यालयाचे तातडीने स्थलांतर करा, अशी मागणी इमारत मालकांनी केली. तसेच गेली 70 वर्षे प्रति महिना केवळ 70 रूपये एवढेच भाडे पोस्ट खाते देत असल्याचा मुद्दाही इमारत मालकांनी मांडला. 

दरम्यान, पोस्ट कार्यालय स्थलांतराबाबत कार्यवाही सुरू आहे. शहरात 7 ठिकाणी जागा पाहिल्या आहेत. आठवडाभरात वरिष्ठ अधिकारी येऊन जागा निश्‍चित करतील, त्यानंतर कार्यालय स्थलांतर करू, अशी ग्वाही पोस्ट खात्याचे उपनिरीक्षक श्री. कामथे आणि श्री. नकाशे यांनी दिली. 
शहरातील मुख्य पटवर्धन चौकालगत कणकवली तालुक्‍याचे पोस्ट कार्यालय आहे. अत्यंत जीर्ण इमारतीमधून पोस्ट खात्याचा कारभार सुरू आहे. चार दिवसांपूर्वी या इमारतीची मागील बाजूची भिंत कोसळली होती. पोस्ट खात्याने तातडीने दुरूस्ती केली. या दुरूस्तीला इमारत मालकांनी आक्षेप घेतला आणि हा वाद सोडविण्यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे धाव घेतली. 

नलावडे यांच्या दालनात पोस्ट कार्यालय स्थलांतराबाबत बैठक झाली. यात जमीन मालक अमजद शेख, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, पोस्ट खात्याचे अधिकारी श्री. कामथे आदी उपस्थित होते. मालक शेख म्हणाले, इमारत मोडकळीस आली तरी पोस्ट खाते जागा खाली करत नाही. 70 वर्षे प्रतिमहिना केवळ 70 रूपये एवढेच भाडे देत असल्याचा मुद्दा मांडला. 

...तर भाडे वाढवून द्या ः नगराध्यक्ष 
सहाय्यक पोस्ट मास्तर रामदास नकाशे म्हणाले, पोस्ट कार्यालयाची नवीन जागा निवडण्यासाठी 29 ऑक्‍टोबरला वरिष्ठ समिती येत आहे. त्यावेळी एक जागा निश्‍चित होईल. लॉकडाउनमुळे स्थलांतर लांबणीवर पडले आहे. शेख म्हणाले, पोस्ट खाते 20 वर्षांपासून स्थलांतराबाबत अशीच टोलवाटोलवी करत आहे. दरम्यान, नगराध्यक्ष नलावडे म्हणाले, पोस्टाने जागा खाली करावी किंवा इमारत मालकांशी चर्चा करून त्यांना भाडे वाढवून द्यावे. इमारत मालकांना विश्‍वासात न घेता, इमारतीची डागडुजी करणे हा गुन्हा ठरू शकतो. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: post office issue kankavli sindhudurg