हत्तींना रोखणार 'ही' बटाटा बंदूक

प्रभाकर धुरी
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

हत्तींच्या कळपाकडून शेती बागायतीचे होणारे नुकसान हा नेहमीच डोकेदुखीचा प्रकार... पण या उपद्रवी हत्तींना पिटाळून लावण्यासाठी वन विभागाने नामी शक्कल लढवत बटाटा गनची निर्मिती केली आहे.

सिंदुदुर्ग - हत्तींना पिटाळण्यासाठी आता बटाटा बंदुकीचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुक्‍यात चार ठिकाणी हत्ती कॅम्प उभारण्यात आले आहेत. कॅम्प चंदगड तालुक्‍यातील हत्तीप्रवण क्षेत्रातही उभारण्यात आले आहेत.

वन विभागाने नामी शक्कल

हत्तींच्या कळपाकडून मोठ्या प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान केले जात आहे. तिलारी खोऱ्यातील आयनोडे हेवाळे, बाबरवाडी, घाटीवडे, बांबर्डे, वीजघर, केंद्रे, सोनावल, घोटगेवाडी, केर, मोर्ले, पाळये आदी गावात हत्तींचा वावर सुरू असतो. हत्ती खातो त्यापेक्षा अधिक नुकसान शेती, बागायतीचे करतो. तो आता बिनधास्त वस्तीत वावरतो. त्याने अलीकडे शेतकऱ्यांवर हल्ला करण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे त्याला वस्ती आणि शेती बागायतींपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न वनविभागाचा असतो.

हत्तीच्या मागावर आहे बटाटा बंदूक

आतापर्यंत त्यासाठी विविध उपाय आणि अनेक उपक्रम राबवून झाले; पण हत्ती कायमस्वरूपी जाण्याचे नाव घेत नाहीत. खंदक खोदले, सिमेंटच्या भिंती बांधल्या, एलिफेंट गो बॅक मोहीम राबवून झाली, हत्ती पकड मोहीम झाली, ऑईल आणि मिर्चीपूड मिश्रित दोरखंड बांधून झाले, मधमाश्‍यांच्या पेट्या पण जंगलात बांधून झाल्या; पण हत्ती परतण्याचे नाव घेत नाहीत. आता तर फटाके, बॉंबच्या जोडीने बटाटा बंदूकही वापरली जाणार आहे. हत्ती शेती, बागायती किंवा वस्तीत आल्याचे समजले की वनविभाग आणि स्थानिक गस्तीपथके हत्तीच्या मागावर जाऊन बटाटा बंदूक वापरणार आहेत. त्यासाठी तालुक्‍यात कोनाळ वन परिक्षेत्राच्या हद्दीत साटेली भेडशी येथे मुख्य हत्ती कॅम्प बनविण्यात आला आहे. अन्य तीन हत्ती कॅम्प घाटीवडे, हेवाळे आणि सोनावल या ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. वनपाल दत्ता मोकाडे, वनरक्षक एस. जे. कुदाळ, बी. व्ही. डोंगरे, संतोष ढोले, ग. ब. भोसले, ए. व्ही. खामकर, रामराव लोंढे, वनकर्मचारी आदी हत्ती कॅम्प कार्यान्वित ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

हेही वाचा - सिंधुदुर्गातील या किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन 

हत्तींचा कळप पार्लेमध्ये 

केंद्रे परिसरात बारा दिवसांपूर्वी (ता. 21 नोव्हेंबर) वावरणारा चार हत्तींचा कळप दुसऱ्या दिवसापासून वीजघर सोडून गेला. सुरवातीला तो चंदगड तालुक्‍यातील हेरे गुडवळे परिसरात होता तर मंगळवारी (ता. 3) तो पार्ले परिसरात होता. त्या परिसरातही आता हत्ती कॅम्प उभारण्यात आले आहेत. 

काय आहे ही बटाटा बंदूक? 

बंदूक मोठ्या आकाराची; पण हलकी आहे. बंदुकीच्या नळीच्या तोंडावर बटाटा खेचून भरला जातो. नळीचे तोंड बटाट्याने पूर्ण बंद केले जाते. त्यानंतर मध्यभागी असलेल्या डबीत बॉडी स्प्रे मारून लगेच झाकणाने डबी बंद केली जाते. त्याच्या खालच्या बाजूला ट्रीगर असतो. तो लायटरचे काम करतो. ट्रीगर दाबला की स्प्रेमुळे आत तयार झालेला गॅस पेटतो, आतील बटाटा वेगाने लक्ष्याच्या म्हणजे हत्तीच्या दिशेने जातो. या दरम्यान मोठा आवाज होतो आणि हत्ती जंगलाच्या दिशेने पळ काढतो. अशा रितीने बटाटा बंदूक वापरात येते. त्यात बटाट्याऐवजी सोडा बॉटलची जाड काचही वापरात येते.  

हे वाचलं का ? डॉ. बाबासाहेबांच्या मूळ घराचा दगड लखनौमध्ये प्रेरणास्रोत -

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A potato gun will now be used to beat the elephants.