सिंधुदुर्गातील 'या' किनाऱ्याला "ब्लू फ्लॅग' मानांकन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

सिंधुदुर्गातील वेगाने पर्यटन वाढणाऱ्या किनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. याच्या बाजूला निवती, खवणे येथील किनारेही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे या भागात पर्यटनाच्या अनुषंगाने विविध व्यवसायही वाढू लागले आहेत.

कुडाळ  ( सिंधुदुर्ग ) :  भोगवे समुद्र किनाऱ्याला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मानाचे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे येथील पर्यटनाला नवी झळाळी मिळाली आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामान बदल मंत्रालयाने पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्क या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थेकडून विविध मानकांच्या आधारे भारतातील समुद्र किनाऱ्यांचा अभ्यास केला.

एकूण 4 उत्कृष्ट मानकांच्या 33 घटकांच्या आधारे ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी देशातील सर्वोत्कृष्ट 13 समुद्र किनाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यात भोगवे समुद्र किनाऱ्याचा समावेश आहे.

हेही वाचा - लोकमान्य टिळकांचे जन्मस्थळ विकसित कधी होणार ? 

भोगवे समुद्र किनारा यात ठरला उत्कृष्ट

भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो. लांबच्या लांब पसरलेली पांढऱ्या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनाऱ्यावरील माड , पोफळीच्या बागा यामुळे समुद्र किनाऱ्यावरील निसर्ग सौंदर्य अधिक देखणे दिसते. याच समुद्र किनाऱ्याची पर्यावरण अभ्यास संस्था, डेन्मार्कने ब्लु फ्लॅग प्रमाणपत्रासाठी निवड केली. पर्यावरण शिक्षण आणि माहिती , आंघोळीच्या पाण्याची गुणवत्ता , पर्यावरण व्यवस्थापन आणि संवर्धन तसेच सुरक्षा व समुद्र किनाऱ्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा या प्रमुख चार निकषांवर भोगवे समुद्र किनारा उत्कृष्ट ठरला आहे. केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राज्यसभेत एका प्रश्‍नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

हेही वाचा - नाणार संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केली ही घोषणा 

पर्यटनाला चालना

सिंधुदुर्गातील वेगाने पर्यटन वाढणाऱ्या किनाऱ्यांमध्ये भोगवेचा समावेश होतो. याच्या बाजूला निवती, खवणे येथील किनारेही पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. यामुळे या भागात पर्यटनाच्या अनुषंगाने विविध व्यवसायही वाढू लागले आहेत.
कोकण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Tourism Bhogave Shore Blue Flag Rating