भाजपला हटवा; देशाची इभ्रत वाचवा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 मार्च 2019

रत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍की थांबवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

रत्नागिरी - देशाची इभ्रत वाचवायची असेल, तर भारतीय जनता पक्षाला हटवा, असे आवाहन करीत भारतीय रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे पंतप्रधानांवर निशाणा साधला. एअर स्ट्राईकमध्ये मारल्या गेलेल्या ३५० अतिरेक्‍यांपैकी एकाचा तरी पुरावा द्या आणि परदेशातील भारताची नाचक्‍की थांबवा, असे आव्हानही त्यांनी दिले.

येथील चंपक मैदानावर महामेळाव्यात आंबेडकर म्हणाले, ‘‘कोकणातील बेदखल कुळांचा प्रश्‍न कोणत्याच सरकारने हाताळला नाही. २० वर्षांत एकदा पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन एअर स्ट्राईक केले, त्याचे मार्केटिंग सुरू आहे. पाकने चार तासांत लष्करावर बॉम्ब टाकला आणि त्यांच्यावर कारवाईसाठी आपल्याला १४ दिवस लागले. आंतरराष्ट्रीय प्रेस म्हणतेय की तुम्ही एक बॉम्ब टाकला. त्याचे पुरावे दाखवा. ३०० अतिरेकी मारले गेले, हे खोटे आहे. पंतप्रधान यावर उत्तर देत नाहीत. या परिस्थितीत मोदींना पुन्हा निवडून दिले, तर देशाला कोणीही सिरीअसली घेणार नाही.’’

ते म्हणाले, ‘‘नारायण राणे मुख्यमंत्री झाले, हे कोकणचे दुर्दैव आहे. त्यामुळे येथील जमिनी विकण्याशिवाय लोकांना पर्याय नाही. कोकणात खनिजे आहेत, त्याचा वापर कोणी श्रीमंत होण्यासाठी करणार असेल, तर पोलिसांनाही अंगावर घेईन आणि लढा उभारेन. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्यानंतर कोकणचा विकास करणारे नेतृत्वच पुढे आले नाही. ब्रिटिशांनी कायद्याने खोतकी नष्ट केली, तरीही येथील लोक खोतांच्या दबावाखाली आहेत. आतापर्यंत कोणत्याही आमदाराने, खासदाराने बेदखल कुळांचा प्रश्‍न सोडवायचा प्रयत्न केला नाही. अनंत गिते पाच वेळा खासदार झाले, तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.’’ 

ते म्हणाले, ‘‘पर्यटन वाढीकडे दुर्लक्ष करून केमिकल उद्योग आणून येथील हवा दूषित केली जातेय. उद्योग आला म्हणजे काम मिळते, असे नाही. नव्या उद्योगात रोजगार कमी मिळतो आणि प्रदूषण वाढते. तंत्रज्ञान माणसाला बेरोजगार करणारे नसावे.’’

ढाण्या वाघ भुईसपाट होईल
लोकशाहीत मतदार राजा आहे. त्या मतदारापुढे ढाण्या वाघाचे काहीच चालू शकत नाही. लोकशाहीत सगळे वाघ तुमच्यामुळे घडलेले आहेत. तुम्ही त्याला आपटले तर तो ढाण्या वाघ भुईसपाट होईल, असा टोला आंबेडकर यांनी हाणला.

...अन्‌ तणाव निवळला
सभा सुरू असताना दोन तरुण दुचाकीवरून भगवा झेंडा फडकवत सभा स्थानावरून उद्यमनगरच्या दिशेने जात होते. त्यावरून तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तणाव निवळला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar comment