मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतरच प्रमोद जठार प्रचारात उतरणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मार्च 2019

कणकवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जिल्हा कार्यकारिणीची बैठक वर्षा बंगल्यावर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.

कणकवली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर जिल्हा कार्यकारिणीची बैठक वर्षा बंगल्यावर होत नाही, तोपर्यंत कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका आम्ही घेतल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे दिली.

भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर श्री. जठार पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी प्रदेश चिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष संदेश पटेल, जिल्हा सरचिटणीस रवींद्र शेटये, चंद्रहास सावंत उपस्थित होते.

श्री. जठार म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी पक्षादेश आणि युतीचा धर्म पाळावा, असे आवाहन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. त्यांनी कणकवलीतील बैठकीनंतर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला; परंतु कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. खासदार विनायक राऊत यांच्याविरोधात प्रचंड असंतोष आहे. पाच वर्षांत भाजप कार्यकर्त्यांना खासदार राऊत आणि शिवसेनेकडून मोठा त्रास झाला. त्यामुळे कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत. त्या अनुषंगाने पुढील दोन दिवसांत भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मुख्यमंत्र्यांबरोबर वर्षा बंगल्यावर होईल. या बैठकीतील निर्णयानंतरच कुणाचा प्रचार करायचा, त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत.’’

ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपची दोन लाख मते आहेत. ही मते ज्या उमेदवाराला पडणार तोच पुढील खासदार असणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेचाच उमेदवार असेल, याचीही निश्‍चिती झालेली नाही. पुढील कालावधीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्यालाही येऊ शकतो. तसे झाल्यास केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू किंवा मी स्वत: उमेदवार असणार आहे. युतीत सध्या मतदारसंघाची अदलाबदल सुरू आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येण्याची शक्‍यता आहे.’’

रत्नागिरीतही विरोध; आज चर्चा
लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी उद्या (ता. १२) रत्नागिरी येथे भाजपच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीला मी आणि प्रदेश चिटणीस राजन तेली उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतही खासदार राऊत यांच्याविरोधात आम्ही मुद्दा मांडणार आहोत. सिंधुदुर्गप्रमाणे रत्नागिरी येथील कार्यकर्त्यांचाही राऊत यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे श्री. जठार म्हणाले.

मोदी यांना पंतप्रधान करायचे असेल तर युती करावीच लागेल आणि पक्षादेशही पाळावे लागतील. युती करताना शिवसेनेसोबत ॲग्रीमेंट करू. यात गेल्या पाच वर्षांत कोकणातील भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तसा होणार नाही.
- प्रसाद लाड,
आमदार

मोदींना पुन्हा पंतप्रधान व्हायचे असेल तर कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. पक्ष आदेश देईल तो पाळणं भाग आहे. पाच वर्षांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींचा प्रचार केला. मोदींना मत म्हणजेच मनसेला मत असं ते म्हणाले. परिणाम काय झाला तर मनसे संपली. आज स्वाभिमान पक्षही त्याच वाटेवर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये.
- रवींद्र चव्हाण,
राज्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Jathar comment