पारंपारिक मच्छिमारांची मुख्यमंत्र्यांशी भेट घडवू

प्रशांत हिंदळेकर
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मच्छीमारांमध्ये समन्वय साधून हा प्रश्‍न सुटायला हवा. यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या होणार्‍या जाहीर सभेपूर्वी मच्छीमारांची त्यांच्याशी भेट घडवून देऊ

मालवण - पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळावा, ही भाजपची भूमिका राहिली आहे. पर्ससीनच्या मासेमारीबाबत भाजप सरकारनेच अधिसूचना काढली. मात्र मत्स्य व्यवसाय खात्यातील काही अधिकारी मस्ती करताहेत हे चुकीचे असून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार म्हणाले. तसेच मच्छीमारांमध्ये समन्वय साधून हा प्रश्‍न सुटायला हवा. यासाठी जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या होणार्‍या जाहीर सभेपूर्वी मच्छीमारांची त्यांच्याशी भेट घडवून देऊ असे आश्वासही यावेळी श्री जठार यांनी दिले. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन तेली उपस्थित होते. 

श्री. जठार म्हणाले, पारंपरिक मच्छीमारांच्या समस्यासंदर्भात तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. त्यामुळेच पर्ससीननेटच्या मासेमारी विरोधात अधिसूचना काढण्यात आली. अधिसूचनेनंतर ती कारवाई व्हायला हवी होती ती झाली नाही. ही वस्तुस्थिती आहे. मात्र याला मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांची मस्ती कारणीभूत आहे. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी. पारंपरिक मच्छीमारांच्या विरोधात कोणीही नाही. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार्‍या जाहीर सभेपूर्वी आपण पारंपरिक मच्छीमारांची त्यांच्याशी भेट घडवून देऊ. यासाठी पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ बनवावे अशा सूचना त्यांनी तालुकाध्यक्ष केनवडेकर यांना दिल्या. 

शेतकर्‍यांप्रमाणे मच्छीमारांची खावटी तसेच अन्य योजनांवरील कर्जे माफ व्हायला हवीत अशी आमची भूमिका आहे. मत्स्यदुष्काळाची समस्या मच्छीमार बांधवांना भेडसावत असल्याने यातून मच्छीमारांना दिलासा मिळायला हवा. यासाठी केंद्रस्तरावर स्वतंत्र मत्स्य खात्याची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक मच्छीमार हे युतीसोबतच राहतील याची काळजी येत्या काळात घेऊ. 

- प्रमोद जठार,  भाजपचे जिल्हाध्यक्ष

खासदार राणे हे सर्व पक्षांची आपल्याला साथ असल्याचे सांगत असून याबाबत भाजपची भूमिका काय? असा प्रश्‍न केला असता जठार म्हणाले, भाजप युतीच्या धर्माचे पालन करणार आहे. खरे मोदी समर्थक ही शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आमची अधिकृत युती आहे. त्यांच्यासोबतच काम करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात धनुष्यबाणालाच मत देण्याचे काटेकोरपणे पालन होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

युतीचा कुडाळ - मालवण तालुक्याचा मेळावा चार तारखेला कुडाळ येथे दुपारी बारा वाजता होणार आहे. या मेळाव्यास तालुक्यातून सुमारे दोनशे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील. कुडाळ येथे होणार्‍या मेळाव्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह युतीचे उमेदवार विनायक राऊत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील

येथील भाजपच्या तालुका कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यानंतर श्री. जठार, श्री. तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रभाकर सावंत, भाऊ सामंत, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, दीपक सांडव, पूजा करलकर, बबलू राऊत उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Jathar comment