शिवसेना संपेल, पण रिफायनरी होणारच; प्रमोद जठार यांचा विश्‍वास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

राजापूर तालुका बार असोसिएशनने राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे रिफायनरीबाबत केलेली मागणी रास्त आहे. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. नाणार रिफायनरीबाबत राजापूर येथील स्थानिक संघटना आक्रमक होत आहे.

रत्नागिरी - ज्या दिवशी शिवसेना सत्तेतून उतरेल, त्याच्या दुसऱ्या दिवशी नाणार रिफायनरीची अधिसूचना काढली जाईल, हा माझा शब्द राहील. नाणार येथील रिफायनरी होणार आहेच. एकवेळ शिवसेना संपेल, पण रिफायनरीचा विषय संपणार नाही, असा विश्‍वास भाजपचे राज्य सचिव तथा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्‍त केला. 

राजापूर तालुका बार असोसिएशनने राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे रिफायनरीबाबत केलेली मागणी रास्त आहे. त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. नाणार रिफायनरीबाबत राजापूर येथील स्थानिक संघटना आक्रमक होत आहे. त्यांना भाजपकडूनही पाठबळ मिळत आहे. भाजपचे पदाधिकारी प्रमोद जठार यांनी वारंवार रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. रत्नागिरीत आलेल्या जठार यांनी राजापूरच्या बार असोसिएशनने घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केले आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या नाणार रिफायनरीविरोधी मतांवर जोरदार टीकास्त्र सोडले. 

ते म्हणाले, पक्षाचा पदाधिकारी म्हणूनच नव्हे, तर कोकणवासीय म्हणून मी सातत्याने रिफायनरी होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी रिफायनरीचा विषय संपला असे जाहीर केले होते. कोकणच्या विकासासाठी हा प्रकल्प गरजेचा आहे. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेले नाही. त्यामुळे रिफायनरी संपली असे म्हणून बेरोजगारांची टिंगल करणे बंद करा. सरकार केव्हा जाईल हे मी आताच सांगणार नाही. त्यासाठी थोडा धीर धरा. लवकरच ते घडेल. 

ऑक्‍सिजन परत पाठवणे दुर्दैवी 
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना ऑक्‍सिजनचा टॅंकर माघारी पाठवतात हे रुग्णांचे दुर्दैव आहे. अनेक रुग्णांना आज व्हेंटिलेटरची गरज आहे. कोल्हापूरमधूनही ऑक्‍सिजन मिळत नाही. त्यामुळे प्रशासन किती कुचकामी आहे ते दिसते, असा आरोप डॉ. विनय नातू यांनी केला. आरटीपीसीआर तपासणीच अहवालातील दिरंगाई डॉक्‍टरांमुळे होते. गोव्यात तो दोन तासात मिळतो. रत्नागिरीत का नाही? असा प्रश्‍न युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केला. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Jathar Comment On Nanar Refinery And Shivsena