देवगड -जामसंडे  नगराध्यक्षपदी प्रणाली माने

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जून 2019

देवगड - येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रणाली माने यांची तर उपनगराध्यक्षपदी उमेश कणेरकर यांची आज निवड झाली. प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते यांच्या उपस्थितीत ही निवड घोषित करण्यात आली.

देवगड - येथील देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रणाली माने यांची तर उपनगराध्यक्षपदी उमेश कणेरकर यांची आज निवड झाली. प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते यांच्या उपस्थितीत ही निवड घोषित करण्यात आली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ उपस्थित होते. 

नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम सोमवारपासून (ता.24) सुरू होता. नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी (ता.24) प्रणाली माने यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्याच दिवशी झालेल्या छाननीत त्यांचा अर्ज वैध ठरला होता. तर आज त्यांच्या निवडीची घोषणा झाली. त्यांच्या निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

प्रणाली माने सध्या नगरपंचायतीच्या स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, क्रीडा समिती सभापती पदावर कार्यरत होत्या. आता त्यांची नगराध्यक्षपदी निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठीच्या निवडीचा संपूर्ण कार्यक्रम आज घेण्यात आला. त्यानुसार उपनगराध्यक्ष पदासाठी उमेश कणेरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. छाननीत अर्ज वैध ठरला. त्यांच्या निवडीची घोषणा दुपारी करण्यात आली. यावेळी सहकारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी माने आणि कणेरकर यांचे अभिनंदन केले. तसेच स्वाभिमान पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळ खडपे, तालुकाध्यक्ष अमोल तेली, संदीप साटम, ज्ञानेश्‍वर खवळे, गणपत गांवकर, मावळते उपनगराध्यक्ष संजय तारकर, विरोधी पक्षाच्या गटनेत्या हर्षा ठाकूर, राजेंद्र वालकर, प्रियांका साळसकर, नीरज घाडी, उज्ज्वला अदम आदींनी त्यांचे अभिनंदन केले. 

शहराच्या विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल. आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अभिप्रेत असलेला शहराचा विकास करण्यावर भर राहील. नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याकडे लक्ष राहील

-  प्रणाली माने


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranali Mane as city head of Devgad Jamsande