शिवसेना महिला जिल्हाप्रमुखांवर कारवाई करणार का?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

कणकवली - खासदार विनायक राऊत यांच्याबाबतची पोस्ट व्हायरल करण्यामध्ये शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आघाडीवर होत्या. त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्‍न स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी केला.

कणकवली - खासदार विनायक राऊत यांच्याबाबतची पोस्ट व्हायरल करण्यामध्ये शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आघाडीवर होत्या. त्यांच्यावर कारवाई करणार का? असा प्रश्‍न स्वाभिमानच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे यांनी केला.

भाजप पक्षावर टीका करून प्रसिद्धी मिळत नसल्याने आता शिवसेनेची मंडळी स्वाभिमान पक्ष व राणे कुटुंबावर टीका करीत आहेत. तसेच शिवसेना व भाजपमध्ये गैरसमज निर्माण करण्याची स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना आवश्‍यकता नाही. या दोन्ही पक्षामध्ये आधीच वितंडवाद असल्याचेही त्या म्हणाल्या.

येथील स्वाभिमान पक्ष कार्यालयात प्रणिता पाताडे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी तालुकाध्यक्षा स्वाती राणे, कणकवली नगरसेविका मेघा गांगण, शहराध्यक्षा संजीवनी पवार, कुडाळ नगरसेविका संध्या तेरसे, सरोज जाधव, कुडाळ उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर यांच्या साक्षी सावंत, भाग्यलक्ष्मी साटम, हेलन कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

प्रणिता पाताडे म्हणाल्या, ‘‘शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांना स्वबळाची खुमखुमी आहे. त्यामुळे भाजपविरोधातील पोस्ट मिळताच त्यांनी ती व्हायरल करायला सुरवात केली. यात जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत आघाडीवर होत्या. त्याबाबतचे पुरावे आमच्याकडे आहेत. राऊत यांच्यावरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेतेमंडळी, कार्यकर्त्यांना उपरती झाली. त्यानंतर आज  खासदार राऊत यांनी पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठीचे निवेदन पोलिस अधीक्षकांना दिले. जर शिवसेना महिला जिल्हाप्रमुखांनीच पोस्ट व्हायरल केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची धमक खासदार दाखवणार का?’’

पाताडे म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्गातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विनायक राऊत यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध आहे. त्याबाबत त्यांनी जाहीर भूमिका देखील मांडली आहे. त्यामुळे स्वाभिमान पक्षाचा सेना- भाजपत गैरसमज निर्माण करण्याचा प्रश्‍नच येत नाही. भाजप कार्यकर्ते हा गैरसमज निवडणुकीतूनच राऊत यांना दाखवून देतील.’’

राऊत यांनी आपली गाडी जाळून दाखवावी
स्वाभिमानचे कार्यकर्ते आपल्या कार्यकर्तृत्वाने मोठे झाले आहेत. आम्हाला गाड्या जाळून प्रसिद्धी मिळविण्याची गरज नाही. तसेच खासदार राऊत यांनी आधी स्वत:ची गाडी जाळून पाहावी म्हणजे गाडी जळण्याचे दु:ख काय असते, ते त्यांना समजेल, असे नगरसेविका मेघा गांगण म्हणाल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pranita Patade comment