पडद्यामागील माणसांसाठी धावली पडद्यावरील माणूसकी  

प्रमोद हर्डीकर
Thursday, 24 September 2020

या बॅकस्टेज कलाकारांना रंगभूमीशिवाय इतर आर्थिक मदत मिळत नव्हती.

साडवली - कोरोना काळात गेले सहा महिने नाट्यव्यवसाय बंद आहे. याच व्यवसायावर पोट भरणाऱ्या पडद्यामागील कलाकारां फार हाल झाले. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मराठी नाट्य समुहाने सोशल मीडियावरुन मदतीचे आवाहन केले. मार्च पासून सप्टेंबरपर्यंत आम्ही या कलाकारांना ३९ लाख ३७ हजार रुपये दिले अशी माहीती अभिनेते प्रशांत दामले यांनी सकाळशी बोलताना दिली. 

याबाबत आशीर्वाद मराठे यांनी तपशीलवार उपक्रमाची माहीती दिली. या बॅकस्टेज कलाकारांना रंगभूमीशिवाय इतर आर्थिक मदत मिळत नव्हती. सहा महिने हा नाट्यव्यवसाय बंद आहे. या काळात या कलाकारांसाठी आशीर्वाद मराठे, प्रशांत दामले, शेखर ताम्हाने, चंद्रकांत कुलकर्णी, अशा अनेक नामवंत अभिनेते, दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर ग्रुप तयार केला. मार्च पासून या सर्वांनी एक हात माणुसकीचा ...विश्वासाचा..आपल्या माणसांना सावरण्याचा...अशा आशयाखाली मदतीचे आवाहन केले. देशासह परदेशातूनही केवळ विश्वासावर निधी जमत गेला व या कलाकारांना २ हजार ५०० रुपये दिले गेले. ही रक्कम ३९ लाख ३७ हजार ५०० इतकी झाल्याचे दामले यांनी सांगितले.
यामध्ये नेपथ्य कामगार-१४६, साहित्य विभाग-२२, ध्वनी व्यवस्था-१५, रंगभूषा, वेशभूषा-२४, प्रकाश योजना -३१, द्वारपाल-२७, कपडेपट-१५, उपहारगृह कर्मचारी-४, चालक-१०, बुकींग क्लार्क-२२, जाहीरात विभाग-१ अशा कलाकारांना ही मदत मिळवून देण्यात आली.

आर्शीर्वाद मराठे म्हणाले की, प्रशांत दामले यांचा देशासह परदेशात दांडगा संपर्क असल्याने परदेशातुनही चांगली मदत मिळाली.
 

'रंगभूमीची सेवा करताना रसिकांना रंगमंचावर कलाकार दिसतात पण या पडद्यामागील कलाकारांची धडपड कोणाला दिसत नाही. यासाठी या कलाकारांच्या पाठीशी उभे रहाण्यासाठी मराठी नाट्य समुहाने एकत्र येवून हा निधी जमवला व ही छोटीशी मदत या कलाकारांना आम्हांला देता आली. 

-प्रशांत दामले

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prashant damle social media group help to workers