आघाडी सरकारवर प्रवीण दरेकर यांची 'ही' टीका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा टक्के नुकसान भरपाई जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन कुडाळ तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

माणगाव ( सिंधुदुर्ग ) - राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते; मात्र प्रत्यक्षात हेक्‍टरी आठ हजार रुपये भरपाई देऊन, या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे दिलेले वचन म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचे मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले.

माणगाव खोऱ्यातील वाडोस येथे शेतकरी मेळाव्यात श्री. दरेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार रमेश पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली, तालुकाध्यक्ष राजू राऊळ, जिल्हा परिषद सदस्य लॉरेन्स मान्येकर, विनायक राणे, संध्या तेरसे, सौ. सावंत आदी उपस्थित होते.

हेही वाचा - काही सुखद ! सावित्रीच्या 104 लेकींसाठी मिळवले पालकत्व

सरकारने पाचशे कोटीचे पॅकेज देण्याची मागणी

माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर दहा टक्के नुकसान भरपाई जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांना 31 जानेवारीपर्यंत भरपाई देण्याचे आश्वासन कुडाळ तहसीलदार यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे न झाल्यास फेरआढावा घ्यावा, कारण कोकणातील शेतकरी उद्ध्‌वस्त झाला आहे. यासाठी सभागृहात मी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. सरकारने पाचशे कोटीचे पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे; मात्र त्याला हवा तसा पाठिंबा मिळाला नाही. शेतकऱ्यांचे नुकसान झाले पेक्षा ते न होण्यासाठी महसूल विभागाने कार्यरत राहावे, असे यावेळी दरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - मटण दरवाढीमागे हे आहे कारण 

शेतकऱ्यांनी केल्या 'या' मागण्या

यावेळी शेतकऱ्यांना भात खरेदीचा दर वाढवून मिळावा, खासगी व्यापार यांवर निर्बंध लावावेत, शेतकऱ्यांचे शेत मंगराची नुकसानभरपाई मिळावी, वहिवाट, दार, शेतकऱ्यांना आकारीपड जमीन ताब्यात मिळावी आदी मागण्या उपस्थित शेतकऱ्यांनी केल्या. सरकारने सप्टेंबरपर्यंत झालेल्या नुकसानीचे भरपाई देण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात ऑक्‍टोबर-नोव्हेंबर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्न केले आहे, असे दरेकर सांगितले. दादा साईल, दादा बेळणेकर, माणगावकर आदी शेतकऱ्यांनी यावेळी भरपाईबाबत आपण लक्ष घालण्याची विनंती केली.
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Praveen Darekar Criticism On Maharashtra Government Ratnagiri Marathi News