सिंधुदुर्गात जिल्ह्यांत मान्सूनपूर्व पावसाची तुफान बॅटिंग...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

जिल्ह्यामध्ये आठ व नऊ जूनला मिरग ठरला होता. त्यानुसार मिरगापूर्वीचा पाऊस कोसळणार अशी चिन्हे होती. आणि अखेर मे महिन्याच्या अगदी शेवटच्या तारखेला पहिला मान्सूनपूर्व पावसाचा शिडकाव झाला.

सावंतवाडी - हवामान खात्याने 8 जूनला सिंधुदुर्गात मान्सून दाखल होणार असल्याचे सूचित केले होते. त्यानुसार आज जिल्हावासियांनी मान्सूनपूर्व म्हणजेच मिरगापूर्वीच्या पावसाची अनुभूती घेतली. सकाळच्या पावसाच्या शिडकाव्यानंतर सायंकाळी जिल्ह्यांमध्ये पावसाने तुफान बॅटिंग केली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ढगांचा गडगडाट आणि पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

सकाळपासून कडक उन्हाच्या झळा अचानक गायब होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.सायंकाळी तर आणखीन ढग दाटून येताना दिसून येऊ लागले आणि अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळे नागरिकांना गायीचा गारवाही मिळाला. या महिन्याच्या सुरुवातीस दोन वेळा अवकाळी पावसाने नागरिकांची धांदल उडवली होती. यावेळी मान्सून पूर्वीची कामे सुरू होती. मात्र मे महिन्याच्या मध्यान्ह काळात शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व खरीपाच्या कामांना वेग आला होता. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आजचा पाऊस चांगला दिलासादायक ठरणार आहे.

वाचा - संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस....

जिल्ह्यामध्ये आठ व नऊ जूनला मिरग ठरला होता. त्यानुसार मिरगापूर्वीचा पाऊस कोसळणार अशी चिन्हे होती. आणि अखेर मे महिन्याच्या अगदी शेवटच्या तारखेला पहिला मान्सूनपूर्व पावसाचा शिडकाव झाला. या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतीच्या कामांना आणखीन वेग येणार आहे. उद्यापासून बळीराजा खरिपाच्या पेरणीसाठी जोरदार कंबर कसताना दिसून येणार आहे. ग्रामीण भागासह शहरी भागांमध्येही आज कोसळलेला पाऊस नागरिकांना दिलासादायक ठरला आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि दोडामार्ग या तालुक्यांमध्ये अवघी पंधरा मिनिटे मुसळधार पाऊस कोसळला. मिरगा पूर्वीचा पाऊस कोसळल्याने आता पावसाळ्याच्या तयारीसाठी शेतकर्‍यासह सर्वसामान्य नागरिकांची खरेदीसाठी धावपळ होणार आहे हे निश्चित.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre monsoon rains in Sindhudurg district