देशप्रेम लागले ओसरू ! स्वस्तातील चिनी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

"आत्मनिर्भर भारत'चा नारा देत पंतप्रधानांपासून सर्वांनीच चिनी मालाच्या विरोधात मोहीम चालू केली.

चिपळूण - लडाखच्या सीमेवर चीनने भारतीय सैन्यावर केलेल्या भ्याड हल्ल्यावेळी उफाळून आलेले चिपळुणातील नागरिकांचे देशप्रेम आता ओसरू लागले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सजावटीच्या इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तूंची बाजारपेठ मालाने भरली आहे. बाजारपेठेत येणारा ग्राहक स्वस्त चिनी मालाला प्राधान्य देत असल्याचे दुकानदार व व्यावसायिकांनी सांगितले. 

"आत्मनिर्भर भारत'चा नारा देत पंतप्रधानांपासून सर्वांनीच चिनी मालाच्या विरोधात मोहीम चालू केली. नागरिकांकडूनही त्याला प्रतिसाद मिळाला; मात्र गणेशोत्सव काळात हा प्रतिसाद कृतिशील नसल्याचे दिसत आहे. चीनवरून आयात होणाऱ्या वस्तूंमध्ये लाईटच्या माळा, झुंबर, सजावटीच्या वस्तू तसेच मोबाईल, टीव्ही या वस्तूंचा प्रामुख्याने समावेश आहे. या वस्तूंची गॅरंटी नसली तरी त्या स्वस्तात मिळत असल्याने नागरिक भारताऐवजी चिनी मालाची खरेदी करत असल्याचे गणेशोत्सव काळात दिसून आले. गणेशोत्सव काळात मोबाईल, वाहन आणि इतर चैनीच्या पण अत्यावश्‍यक झालेल्या वस्तूंची लोक खरेदी करतात. यात सर्वाधिक मागणी चिनी वस्तूंना आहे. 

 

सध्या सर्वच कंपन्यांचे टीव्ही भारतातच तयार होतात. सोनी, सॅमसंग, व्हिडिओकॉन अशा कंपन्यांचे टीव्ही लोक घेतात. सध्या कंपन्यांचे ब्रॅंडेड टीव्ही यांच्या किमतीत 5 ते 6 हजारांचा फरक असतो. कमी किमतीचे टीव्ही चीनमधून येतात. कमी बजेट असणाऱ्यांची पसंती चिनी टीव्हीला जास्त असते. 
- हिदायत सय्यद, टीव्ही विक्रेता- गोवळकोट रोड. 

हे पण वाचा बाप्पाच्या विसर्जनास गेलेल्या युवकावर काळाचा घाला

भारतीय उत्पादने वापरावीत, असे आम्हालाही वाटते; परंतु किंमत जास्त आणि व्हरायटी नाही, अशी भारतीय मालाची अवस्था आहे. ग्राहक म्हणून पैशाचाही विचार करावा लागतो. मध्यमवर्गीयांची संख्या पाहता भारतीय वस्तूंचा दर्जा वाढायला हवा आणि किंमतही कमी हवी. 
- प्रकाश सोहनी, पाग चिपळूण. 

हे पण वाचादेवरुख आंबवली येथील घटना ; अखेर 2 तासाच्या प्रयत्नाने त्याला मिळाले जीवनदान 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preference to buy Chinese goods in chiplun