
गर्भपात करणे अयोग्य असल्याचा गैरसमज समाजात आहे. त्यामुळे महिला अनेकदा घरगुती उपाय किंवा गोळ्या घेऊन गर्भपात करण्याचा मार्ग निवडतात.
रत्नागिरी : गर्भपातामुळे महिलांना येणारा मानसिक ताण आणि नैराश्य दूर होण्यास आता मदत होणार आहे. सुरक्षित गर्भपाताविषयी असलेला गरैसमज आणि भीती दूर करण्यासाठी राज्यस्तरावर "मर्जी' नावाची हॉटलाइन तयार केली आहे.
पुण्याच्या "सम्यक' संशोधन आणि संसाधन केंद्रातर्फे राज्यस्तरावर ही हॉटलाइन सुरू केली आहे. महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही संस्था काम करत आहे.
गर्भपात करणे अयोग्य असल्याचा गैरसमज समाजात आहे. त्यामुळे महिला अनेकदा घरगुती उपाय किंवा गोळ्या घेऊन गर्भपात करण्याचा मार्ग निवडतात. त्यातून महिला आपला जीव धोक्यात टाकतात. खरंतर सुरक्षितरित्या गर्भपात हा महिलांचा हक्क आहे. गर्भनिरोधक साधनांचा वापर कसा करावा, सुरक्षित गर्भपाताविषयी असलेला गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी पुण्याच्या सम्यक संशोधन आणि संसादन केंद्रातर्फे राज्यस्तरावर "मर्जी' ही हॉटलाइन सुरू केली आहे. 9075764763 या क्रमांकावर महिलांना मोफत मार्गदर्शन मिळणार आहे.
हेही वाचा- देशातील 22 सौंदर्यवतींना मागे टाकत खेडची सुकन्या झाली मिसेस इंडिया ग्लोबन क्विन
आता गर्भनिरोधक कुठे मिळतात, गर्भनिरोधकाचे प्रकार, कशी वापरायची याची माहिती मिळणार आहे. गर्भपाताबद्दल तांत्रिक माहिती, कायद्याबद्दल सेवा पुरविणाऱ्या सरकारमान्य व खासगी गर्भपात केंद्राबद्दल कायदेशीर मार्गदर्शन राज्यभरातील महिलांना मिळणार आहे. या हॉटलाइनबरोबर 30 जून 2020 ला सम्यकने पोर्टलदेखील सुरू केली आहे. यात सुरक्षित गर्भपात सेवा व गर्भनिरोधक साधने याबाबत मराठी भाषेत माहिती उपलब्ध करून दिली आहे. गर्भपाताप्रसंगी काय काळजी घ्यावी, हे माहित असणे आवश्यक आहे.
माहिती गोपनीय ठेवण्यात येणार
एका सर्व्हेनुसार भारतात असुरक्षित गर्भपातामुळे दर दिवशी 10 महिलांचा मृत्यू होतो. हे टाळण्यासाठी महिलांना कायदे संमत आणि सुरक्षित गर्भपात ही संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे. या हॉटलाइनवर माहिती विचारणाऱ्या व्यक्तीचे नाव, माहिती गोपनीय ठेवली जाणार आहे.
हेही वाचा- नारळ फुटला; प्रधानमंत्री आवास योजनेतून घरांचे स्वप्न साकारणार कधी?
महिलांना आजही सुरक्षित गर्भपात कोठे करायचा, तो कसा होतो, गर्भधारणा टाळण्यासाठी काय करायचे याबद्दल योग्य कायदेशीर माहिती नसते. माहितीअभावी अनेक महिला गर्भधारणा नको असेल तर असुरक्षित गर्भपाताच्या मार्गाचा अवलंब करतात. ते जिवावरही बेतते. म्हणूनच महिलांच्या मनातील प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी ही हॉटलाइन सुरू करण्यात आली आहे.
- डॉ. आनंद पवार, संस्थेचे कार्यकारी संचालक
संपादन-अर्चना बनगे