गप्प राहा, शहराचा विकास करा, अन्यथा कारनामे उघड करू - लोबो

भूषण आरोसकर
Wednesday, 16 September 2020

कोठावळे म्हणाल्या, ""नोट पत्रकार परिषद घेऊन बोलणाऱ्या परब यांनी त्यांच्या हातात उरलेल्या 270 दिवसांमध्ये शहराचा विकास करावा.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - पालकमंत्री उदय सामंत यांची घेतलेली भेट ही विकासकामांसाठी निधी आणण्यासाठी होती. कोणाची तक्रार करण्यासाठी नव्हती. त्यामुळे नगराध्यक्ष संजू परब यांनी आता गप्प राहावे आणि विकासकामे करावी, अन्यथा कारनामे उघड करण्यासाठी आमच्याकडे ढीगभर पुरावे आहेत, असा इशारा गटनेत्या तथा ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी दिला. 

आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ नगरसेविका लोबो यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिला तालुका संघटक अपर्णा कोठावळे, श्रुतिका दळवी, नगरसेविका भारती मोरे, दिपाली सावंत, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते. 
यावेळी महिला संघटक सौ. कोठावळे म्हणाल्या, ""नोट पत्रकार परिषद घेऊन बोलणाऱ्या परब यांनी त्यांच्या हातात उरलेल्या 270 दिवसांमध्ये शहराचा विकास करावा.

व्यक्तिगत फायदा बघण्यापलिकडे परब यांनी शहरांमध्ये कुठलाही विकास केला नाही. वाळवेसारखी पालिका राखण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे तर काळ्या यादीमध्ये असलेल्या ठेकेदारांना नगराध्यक्षांनी ठेका देऊन काय साध्य केले?, त्यांची यामागची भूमिका नेमकी काय? त्यामुळे आम्हाला खोटे ठरवणाऱ्या नगराध्यक्षांचा खोटारडेपणा एक दिवस जनतेसमोर नक्कीच येणार आहे.'' 

लोबो म्हणाल्या 
- पदाचा गैरवापर करून पालिकेची ऑफलाईन सभा 
- कधीच गोरगरीबांच्या जनतेच्या पोटावर येणार नाही 
- कोणाच्याही आमिषाला बळी पडलो नाही, पडणार नाही 
- उपनगराध्यक्षा कोरगावकर व आनंद नेवगी हे दोघेही फितूर 
- आमच्या पाठिंब्यावरच कोरगावकर उपनगराध्यक्षा 
- बीओटीला विरोध नाही; विश्‍वासात घेणे गरजेचे 
- सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाहीला आमचा विरोध 
- केसरकरांवर बोलण्याचा अधिकार नगराध्यक्षांना नाही 
- केसरकरांनी दिलेल्या निधीबाबत बोला 

सभेची माहितीच नव्हती 
नगराध्यक्ष परब यांनी दाखवलेल्या अजेंड्यावरील स्वाक्षरी आम्हाला अजेंडा पोच झाल्याची होती; मात्र सभा 
ऑफलाईन असल्याची माहिती नव्हती. असे असले तरी मुख्याधिकाऱ्यांना ऑनलाईन सभा घेण्याचे पत्र देऊनही व त्यांनी ऑनलाईन सभेसाठी एसएमएस पाठवूनही ऑफलाईन सभा घेऊन नगराध्यक्षांनी पदाचा गैरवापर केला. त्यामुळे आम्हाला खोटे म्हणणारे परब यांची कीव येते. 

आदी स्वबळावर निवडून या 
सावंतवाडी -  शहराच्या विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारजीन लोबो करत आहेत. पालिकेतील शिवसेनेची सत्ता गेल्यामुळेच वेगवेगळ्या माध्यमातून ते हे प्रकार करत आहेत. स्वतः पाचवेळा निवडून आल्याच्या बाता करणाऱ्या लोबो यांनी हिम्मत असेल तर आमदार केसरकरांच्या पाठिंब्याशिवाय एकवेळ तरी स्वबळावर निवडून यावे, असे आव्हान भाजप शहर उपाध्यक्ष अजय गोंदावले यांनी दिले. 

शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका तसेच येथील पालिकेतील सेनेच्या गटनेत्या लोबो यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर निशाणा साधला होता. त्यानंतर भाजप शहराध्यक्ष गोंदावळे यांनी लोबोच्या टिकेला उत्तर देत पलटवार केला. ते म्हणाले, "" श्री. परब यांनी नगराध्यक्ष पदावर निवडून येताच, शहरात विकास कामांचा सपाटा लावला आहे. शहरातील भाजी मंडईचा किचकट प्रश्‍न त्याबरोबरच कोरोना संकटातही शहरात योग्य नियोजन, स्टॉल धारकांचे प्रश्‍न आदी मार्गी लावून त्यांनी स्वतः ला सिद्ध केले आहे; मात्र असे असताना शहराच्या हिताच्या दृष्टीने जे-जे प्रकल्प आणले जात आहेत. त्या सर्वांना सेनेचे पदाधिकारी विरोध करत आहेत. आता नव्याने भाजी मंडई तसेच बीओटी तत्त्वावरील अत्याधुनिक मॉल प्रकल्पाला देखील विरोध करत शहराच्या विकासाआड येण्याचा प्रयत्न सेना पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. यात शहराचेच भविष्यात नुकसान होणार आहे आणि याला सर्वस्वी शिवसेना व आमदार केसरकर जबाबदार राहणार आहेत.'' 

नगराध्यक्ष तरी कुठे स्वबळावर निवडून आले? 

सावंतवाडी -  गेली सातवेळा सावंतवाडीच्या नगरसेवक ते नगराध्यक्ष या पदावर आमचे नेते दीपक केसरकर यांच्या आशीर्वादाने व जनतेतील कार्यामुळे अनारोजीन लोबो या निवडून आल्या आहेत; मात्र तुमचे नगराध्यक्ष तरी स्वतःच्या जीवावर कुठे निवडून आले? माजी राज्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे व खोटी आश्‍वासने देऊन ते निवडून आल्याचा टोला नगरसेवक सुरेद्र बांदेकर यांनी लगावला. 

भाजप शहर उपाध्यक्ष अजय गोंदावले यांनी लोबो यांच्यावर टीका करताना केसरकर यांच्या आशीर्वादामुळे निवडून येणाऱ्या दोघांनी एकदा तरी स्वबळावर निवडून यावे, अशी टीका केली होती. याला नगरसेवक बांदेकर यांनी उत्तर दिले असून तसे पत्रक यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

श्री. बांदेकर यांनी पत्रामध्ये, श्री. केसरकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादामुळे कार्यकर्ते निवडून आलो यात आम्हाला कुठेही कमीपणा वाटत नाही; मात्र बाहेरून येऊन सावंतवाडी स्थाईक झालेल्यांनी पात्रता ओळखून बोलावे, असा टोला त्यांनी गोंदावले यांचे नाव न घेता लगावला. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Press conference of Lobo in sawantwadi